चंद्रपूर येथे जागतिक ग्राहक हक्क दिनाचा कार्यक्रम.

चंद्रपूर येथे जागतिक ग्राहक हक्क दिनाचा कार्यक्रम.

ग्राहकांनी प्रशिक्षित होण्याची गरज:-उपविभागीय अधिकारी संजय पवार.

ग्राहक दिनाचे आयोजन ही एक औपचारिकता नसावी आणि असे कार्यक्रम जनतेच्या दरबारातच साजरे केले जावेत:-दीपक देशपांडे, अध्यक्ष जागृत ग्राहक राजा नागपूर,विदर्भ प्रांत.

सरकार समाज आणि ग्राहक यांनी एकत्र येऊन समाजहित जोपासले पाहिजे तरच ग्राहक शोषीत राहणार नाही:-नंदिनी चुनारकर,अध्यक्षा, चंद्रपूर जिल्हा अ.भा.ग्राहक पंचायत.

चंद्रपूर, प्रतिनिधी.

आज ग्राहक या शब्दाची व्याप्ती वाढत असून वस्तूंसोबतच सेवाही ग्राहक या व्याख्येत समाविष्ट झाल्या आहेत परिणामी ग्राहकांचे अधिकारही वाढले असून फसवणूक आणि फसवणुकीच्या प्रकारांमध्ये वाढ झाली असून ग्राहकांना सजग राहण्याची व प्रशिक्षित होण्याची गरज निर्माण झाली असल्याचे मत उपविभागीय अधिकारी चंद्रपूर संजय पवार यांनी आपल्या प्रबोधनातून व्यक्त केले.

जागतिक ग्राहक हक्क दिन१५मार्च निमित्ताने चंद्रपूर तहसील कार्यालयातील सभागृहात जिल्हास्तरीय एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,या कार्यक्रमात मंचावर चंद्रपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष नितीन स्वामी अध्यक्षस्थानी होते,तर प्रमुख अतिथी म्हणून संजय पवार उपविभागीय अधिकारी चंद्रपूर,विजय पवार तहसीलदार चंद्रपूर,दीपक देशपांडे, नागपूर प्रांत अध्यक्ष जागृत ग्राहक राजा, परशुराम तुंडुलवार, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष, ग्राहक पंचायत महाराष्ट्र , नंदिनी चुनारकर, अध्यक्षा अ.भा.ग्राहक पंचायत चंद्रपूर ,सपनकुमार दास, प्रसिद्धी प्रमुख, ग्राहक पंचायत महाराष्ट्र,सुमेर चवरे, अन्नधान्य वितरण अधिकारी चंद्रपूर,सविता गंभिरे, निरीक्षण अधिकारी चंद्रपूर व इतर पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

दीपप्रज्वलन व स्वागत समारोहानंतर….

कार्यक्रमाचे प्रास्ताविक निरीक्षण अधिकारी सविता गंभिरे यांनी केले, त्यानंतर उपविभागीय अधिकारी संजय पवार यांनी मनोगत व्यक्त केले, आणि

आता प्रबोधनासाठी उशिरा पोहोचून ही नाव जाहीर झाले दीपक देशपांडे यांचे , सारेच अवाक! आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान गणमान्य… ग्राहक दिनाच्या शुभेच्छा. ग्राहक दिनाचे आयोजन कां ? कशासाठी? त्याचे महत्व बाजूला सारून हे आयोजन ही एक केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी पार पाडावयाची प्रक्रिया असे समजून राशन धान्य दुकानदार यांना पाचारण करून ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते पदाधिकारी यांना मंचावर बसवून सत्कार करुन आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा प्रकार कित्येक वर्षांपासून सुरू आहे, मात्र ग्राहक दिनाच्या आयोजनाचा उद्देश हा आहे की ग्राहक हक्कांबाबत जनतेची जागृती करणे त्यांना या कायद्याची माहिती करुन देणे आणि फसवणूक टाळण्यासाठी करावयाचे उपायांची माहिती पुरवीणे, मात्र असे होताना दिसत नाही , आम्हीही या कार्यक्रमात सहभागी होतो परंतू प्रशासनाला या चुकीच्या पायंड्यांची जाणीव करून देणे टाळतो व आयोजनाची आणि व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद व आभार मानून चहापान करुन निरोप घेतो…..आणि आपण असे निमुटपणे करतो म्हणून ही पद्धत बदलण्याची प्रशासकीय यंत्रणेला गरजच भासत नाही.., परंतू आमच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मूल तालुक्यातील कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो,यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे..त्यासाठी प्रशासकीय अधिकारी आणि ग्राहक चळवळीत सहभागी पदाधिकारी यांच्यात संवाद आणि समन्वय साधून या कार्यक्रमाची आखणी केली तर हे सगळं शक्य आहे . शेतकऱ्यांच्या फसवणूकीचे उदाहरण देताना अपुऱ्या माहितीमुळे शेतकरी कसा न्यायापासून वंचित राहिला ,बॅंकामध्ये लंचटाईमच्या नावाने कितीतरी वेळ ग्राहक खोळंबून राहतात आणि दुकानदार किती सराईतपणे फसवणूक करुन शिरजोरी करतात याचे दाखले देत अडाणी कोण?असा प्रश्न उपस्थित करीत सुशिक्षित व अशिक्षित सगळ्यांनाच ग्राहक हक्क आणि जबाबदारीची जाणीव करून देण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले.

…..आणि म्हणूनच प्रशासकीय यंत्रणेने आज नंतर ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करताना तो जनतेच्या दरबारात जनहित लक्षात घेऊन ग्राहक जागृती हाच मुख्य हेतू समोर ठेवून अशा कार्यक्रमांचे आयोजन करावे ,हीच आजच्या दिवशी मागणी आणि पुढिल काळात ग्राहक हित लक्षात घेऊन कार्यक्रमाचे नियोजन केले जावे ही अपेक्षा. आपल्या देशात एक नाही तर दोन दोन दिवस राष्ट्रीय आणि जागतिक ग्राहकदिनाच्या निमित्ताने असे आयोजन केले जाते त्यामुळे असा आगळावेगळा देश असल्याचा सार्थ अभिमान बाळगा आणि त्यानिमित्ताने समाज जागृतीचा प्रामाणिक प्रयत्न करावा.असे स्पष्ट करीत कुणाला दुखावणे किंवा आरोप करणे हा आमचा उद्देश नाही ,कुणी दुखावले तर आम्ही माफी मागायलाही तयार आहोत पण तुमच्या आमच्यातले चांगले जटायू वृत्तीचे सेवाभावी कार्यकर्ते आणि प्रशासकीय यंत्रणेतील बिभीषण यांच्या मदतीने एका राम राज्याची संकल्पना आम्हाला साकारायची आहे,एक शोषणमुक्त समाज निर्माण करायचा आहे त्यासाठी आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे असे मत दीपक देशपांडे यांनी व्यक्त केले, यावेळी सभागृहात निरव शांतता पसरली होती.

यानंतर प्रशासकीय यंत्रणेने यांची दखल घेतली आणि पुढिल कार्यक्रम निश्चितपणे जनतेच्या दरबारात घेण्याचे अभिवचन दिले.

सायबर सेलचे अली यांनी आँनलाईन खरेदी व्यवहार व फसवणूक प्रकारांची माहिती देताना घ्यावयाची काळजी याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.

यानंतर बोलताना नंदिनी चुनारकर अध्यक्षा अ.भा.ग्राहक पंचायत चंद्रपूर यांनी खरेदी करताना घ्यावयाची काळजी आणि सरकार समाज आणि ग्राहक यांनी एकत्र येऊन समाजहित जोपासले पाहिजे तरच ग्राहक शोषीत राहणार नाही व पर्यावरण पूरक वातावरण निर्माण करण्याची व त्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली तर ग्राहक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन त्याच दिवशी करण्याची पुरजोर मागणी केली.

याप्रसंगी परशूराम तुंडूलवार, अध्यक्ष ग्राहक पंचायत महाराष्ट्र चंद्रपूर जिल्हाध्यक्ष,ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे चंद्रपूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सपनकुमार दास यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन पुरवठा विभागातील कर्मचारी यांनी पार पाडले.