मूल उपजिल्हा रुग्णालयात ‘ डायलिसिस सेंटर’ सुरू व्हावे .
राष्ट्रवादी शहर अध्यक्ष आकाश येसनकर
मूल (प्रतिनिधी) :
मूल शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच आरोग्याच्या दृष्टीने मोठी व ठाम मागणी पुढे आली आहे. मूल उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटर तातडीने सुरू व्हावे आणि त्याला “प्रभु श्रीराम डायलिसिस सेंटर” हे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट) मूल शहराध्यक्ष आकाश येसनकर यांनी उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
सध्या मूल तालुक्यात डायलिसिसची सुविधा नसल्याने रुग्णांना आठवड्यातून अनेकदा चंद्रपूर (४५ किमी) किंवा नागपूर (१५० किमी) येथे धाव घ्यावी लागते. यामुळे रुग्णांचे आरोग्य खालावत असून, वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो. “मूल उपजिल्हा रुग्णालय हे ४९ ग्रामपंचायती व ८४ महसुली गावांसाठी प्रमुख आरोग्य केंद्र आहे. येथे डायलिसिस सेंटर सुरू झाल्यास शेकडो रुग्णांना त्यांच्या गावीच सोयीस्कर व मोफत उपचार मिळतील. शासनाच्या डायलिसिस योजनेचा थेट लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचेल,” असे आकाश येसनकर यांनी स्पष्ट केले.
या मागणीची प्रत पालकमंत्री मा. प्रा. डॉ. अशोक उईके, आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, जिल्हाधिकारी चंद्रपूर, जिल्हा शल्य चिकित्सक तसेच वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय मूल यांनाही सादर करण्यात आली.
मूल शहरातून आरोग्याच्या दृष्टीने अशा प्रकारची ऐतिहासिक मागणी प्रथमच पुढे आल्याने जनतेत उत्सुकता व समाधान व्यक्त होत आहे.




