मूल : गांधी चौकात यंदाही सामुदायिक प्रार्थनेचा गजर-

मूल : गांधी चौकात यंदाही सामुदायिक प्रार्थनेचा गजर

मुल –   प्रतिनिधी

मूल येथील ऐतिहासिक गांधी चौकात सुमधुर सामुदायिक प्रार्थनेची परंपरा यंदाही सुरू राहणार आहे. कलानिकेतन, श्रमिक एल्गार आणि गांधीवादी विचारांचे नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने मागील दहा वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे.

गांधी चौकाची निर्मिती महात्मा गांधीजींच्या ऐतिहासिक भेटीची आठवण जपण्यासाठी करण्यात आली. सन 1933 आणि 1936 मध्ये गांधीजी मूल येथे थांबून सावलीकडे गेले होते. या स्मृतीप्रीत्यर्थ चौकात महात्मा गांधींचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते आणि बांधकाम मंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या अध्यक्षतेखाली, 24 डिसेंबर 1961 रोजी या पुतळ्याचे अनावरण झाले. कै. सितारामजी गोगीरवार यांच्या स्मरणार्थ नामदेव सोमन्नाजी गोगीरवार यांच्या तर्फे हा पुतळा देणगीस्वरूप देण्यात आला होता.

मूल शहराचे मध्यवर्ती व ऐतिहासिक स्थान असलेला गांधी चौक, कालांतराने दुर्लक्षित राहिला. गांधी जयंतीसारख्या दिवशीही येथे शुकशुकाट दिसू लागल्याचे पाहून कलानिकेतनचे अशोक येरमे आणि श्रमिक एल्गारचे विजय सिद्धावार यांनी पुढाकार घेतला. त्यांनी दहा वर्षांपूर्वी सामुदायिक प्रार्थनेचा उपक्रम सुरू केला. संगीत वाद्यांच्या साथीने सादर होणारी ही प्रार्थना पावसाळ्यातही खंडित न होता आजवर सुरू आहे.

या उपक्रमात स्थानिक गुरुदेव सेवा मंडळ, योग मंडळ तसेच गांधीवादी विचारांचे नागरिक उत्साहाने सहभागी होतात. यावर्षीही 2 ऑक्टोबर रोजी पहाटे सहा वाजता गांधी चौक परिसरात सामुदायिक प्रार्थना आयोजित करण्यात आली असून, अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहून या ऐतिहासिक परंपरेला बळ द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.