विद्यार्थ्यांनीशाळेच्या घेतले पत्रकारितेचे धडे
जि. प. शाळा बोंडाळा बुज. चा उपक्रम
मूल : नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित मूल तालुक्यातील नवरत्न स्पर्धेत केंद्रीय स्तरावर व तालुका स्तरावर प्रथम क्रमांकाची बक्षिसे पटकविणाऱ्या मूल तालुक्यातील बोंडाळा बुज. जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी पत्रकार दिनी पत्रकाराला शाळेत बोलवीत पत्रकारितेबाबतचे धडे गिरवले. विद्यार्थ्यांना वृत्तपत्राविषयी आवड निर्माण व्हावी त्यांना वृत्तपत्र बाबत सखोल ज्ञान मिळावे या उद्देशाने राबविलेल्या या उपक्रमाबाबत शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोंडाळा बुज. चे सरपंच मुरलीधर चुदरी हे होते तर विशेष अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप पाल, मरेगाव येथील पोलीस पाटील पुंडलिकजी जवादे यांची उपस्थिती होती. मुख्य मार्गदर्शक म्हणून लोकमतचे प्रतिनिधी शशिकांत गणवीर उपस्थित होते.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना शशिकांत गणवीर यांनी वृत्तपत्र म्हणजे काय, विद्यार्थ्यांना वृत्तपत्राचे महत्त्व, वृत्तपत्रांची निर्मिती, वृत्तपत्राच्या संपादनापासून वितरणापर्यंतचा प्रवास या सर्व बाबीवर सखोल असे मार्गदर्शन केले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बालवयातच वृत्तपत्रा बाबतची माहिती मिळाल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी वृत्तपत्र महत्त्वाचे असून प्रत्येकांनी आपल्या घरी किमान एक वृत्तपत्र लावून आपापल्या पाल्यांना वृत्तपत्र वाचण्याची सवय लावावी असे आवाहन केले. शाळेचे मुख्याध्यापक किशोर उरकुंडवार यांनी प्रास्ताविक केले तर शालीकराव गेडाम यांनी उपस्थितांचे आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. समीक्षा पाल या विद्यार्थीनीने केले.
यावेळी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार शशिकांत गणवीर यांचा शाळेच्या वतीने शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देत सत्कार करण्यात आला. यशस्वीतेसाठी वैशाली महाकरकार, चुंनीलाल पर्वते, रजनी गेडाम यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह पालक उपस्थित होते.
पत्रकारिता व वृत्तपत्राची कार्यपद्धती विद्यार्थ्यांना अवगत व्हावी, दैनिक वृत्तपत्र वाचनाची सवय लागावी यासाठी राबविलेला हा उपक्रम होता. त्याकरिता पत्रकार शशिकांत गणवीर यांनी केलेले मार्गदर्शन उद्बोधक होते.