स्कॉर्पिओ आणी ट्रॅवल्सची जोरदार धडक – ४ ठार तर १२ जण गंभीर जखमी .

स्कॉर्पिओ आणी ट्रॅवल्सची जोरदार धडक – ४ ठार तर १२ जण गंभीर जखमी .


अपघातातील जखमींवर तातडीने उपचार करा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे निर्देश .

मुल  – प्रतिनिधी

एकीकडे लग्नाचा उत्साह आणि आनंदाचे वातावरण असतानाच, गडचिरोली जिल्ह्यातून एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. लग्नाची वरात घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीला खाजगी ट्रॅव्हल्सने भीषण धडक दिल्याने ४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात २९ मार्च रोजी सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास घडला.

​मिळालेल्या माहितीनुसार, MH 46 P 5392 क्रमांकाची स्कॉर्पिओ गाडी रामपूर येथून लग्नाचा सोहळा आटोपून भाडभीडी मोकासा येथे जात होती. या गाडीत एकूण १६ प्रवासी स्वार होते. ही गाडी गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील कुरुड- तळोधी मोकासा गावादरम्यान असलेल्या नाल्याजवळ पोहोचली असता, समोरून येणाऱ्या MH 15 CK 5005 क्रमांकाच्या प्रवासी ट्रॅव्हल्सशी तिची जोरदार धडक झाली.

​ही धडक इतकी भीषण होती की स्कॉर्पिओ गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर परिसरात एकच आक्रोश निर्माण झाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत जखमींना बाहेर काढले. आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे (यापैकी दोघांचा मृत्यू रुग्णालयात नेत असताना वाटेतच झाला). १२ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

​घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. सध्या जिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत. आनंदाच्या क्षणी ओढवलेल्या या भीषण प्रसंगामुळे भाडभीडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

भीषण अपघातातील जखमींवर तातडीने व गुणवत्तापूर्ण उपचार करावेत तसेच सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आरोग्य प्रशासनाला दिले.