श्री.विलास ढोरे , वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
क्षमता निर्माण केल्याने संधी चालून येतात -मान. प्राचार्य डॉ. ईश्वर मोहुर्ले
देसाईगंज: “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरित करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी उपलब्ध साधने व सोयींचा योग्य वापर करावा व व्यक्तिमत्त्व बहुआयामी बनवावे. त्यांनी कौशल्य संपादनावर अधिक भर द्यावा. ध्येय निश्चित करून ते पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घ्यावे. क्षमता निर्माण केल्या की संधी चालून येतात.” असे मौलिक मार्गदर्शन कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डॉ. ईश्वर मोहुर्ले यांनी केले.
ते नू. शि. प्र. मंडळ द्वारा संचालित आदर्श कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, देसाईगंज येथे शैक्षणिक गुणवत्ता गौरव व पालक सत्कार समारंभात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमात सत्र 2021-22 मध्ये गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षेत महाविद्यालयातील कला,वाणिज्य व विज्ञान शाखेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षामध्ये विषयामध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना, कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांतून सर्वप्रथम येणाऱ्या खुल्या प्रवर्गातील व अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना रोख पुरस्कार व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे पदवी व पदव्युत्तर स्तरातून प्रत्येक वर्गातून प्रथम व द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रंथरूपी भेट देऊन व त्यांच्या पालकांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
“गुणवंत विद्यार्थी हा महाविद्यालय, कुटुंब व समाजासाठी भूषण आहे. विद्यार्थ्यांनो जिद्दीने प्रेरित व्हा, पालकांचे स्वप्न पूर्ण करा व गुणवत्तेने पृथ्वीवर स्वर्गाची निर्मिती करा. सहनशीलता, जिद्द आणि दूरदृष्टीने अशक्यप्राय गोष्टी साध्य करता येतात.” असे आवाहन वजा मार्गदर्शन विशेष अतिथी म्हणून बोलताना मान. अशोकजी नेते, खासदार गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र यांनी केले. संस्थासचिव मान. मोतीलालजी कुकरेजा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून संस्थाध्यक्ष मान.केवळरामजी घोरमोडे, संस्थेचे उपाध्यक्ष मा.जगदीशजी शर्मा, संस्था सहसचिव मा. ओमप्रकाशजी अग्रवाल, संस्था सदस्य मा.अब्दुल जहीर शेख, मा.योगेशजी नागतोडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा, माजी प्राचार्य डॉ. पी.एच. बाळबुद्धे, सांस्कृ. विभाग प्रमुख डॉ. जे. पी. देशमुख प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. समारंभाचे अध्यक्ष मान. मोतीरामजी कुकरेजा म्हणाले की “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, ज्या विद्यार्थ्यांना अपयश आले त्यांनी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांची प्रेरणा घेऊन गुणवत्ता वाढवावी व आपल्या पालकांना सन्मानाची संधी उपलब्ध करून द्यावी.” महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रम आयोजनाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ हितेंद्र धोटे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. जे. पी. देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी, त्यांचे पालक व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.