गडचिरोली प्रतिनिधी , न्यूज जागर
स्थानिक नगर परिषद हद्दीअंतर्गत येत वॉर्डनिहाय मतदारांची यादी नियमित केली जात नसल्याने मागील अनेक वर्षांपासून तीच मतदार यादी जाहीर केली जात आहे. यामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहत असल्याचे निदर्शनास येत आहे. या मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप करीत प्रत्येकाला मतदानकार्ड वाटप करून नव्याने सर्व वार्डाचे सर्वेक्षण करून मतदार यादी तयार करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी जिल्हा युवक कॉंग्रेसचे विधानसभा अध्यक्ष रुपेश वलके यांनी केली आहे.
नगर परिषद अंतर्गत मागील कितीक वर्षांपासून जुनीच यादी सादर केली जात आहे. आजपर्यंतच्या यादीत वॉर्डात हजर नसलेले, लग्न झालेले, मयत झालेले वा नवीन अर्ज सादर करणाऱ्यांची नावे समाविष्ट नाहीत. शासन स्तरावरून नियुक्त केलेल्या बीएलओकडे याची जबाबदारी असताना त्यांनी इमानेइतबारे आपले काम केले नसल्याचा आरोप त्यांनी केला. दर पाच वर्षांनी मतदार सर्वेक्षण करण्यासाठी कोट्यावधी रुपयाचा खर्च केला जातो. मात्र नगर परिषद हद्दीतील नागरिकांना अद्यापपर्यंत निवडणूक मतदानकार्ड उपलब्ध झालेले नसल्याने या निधीचा उपयोग काय? असाही प्रश्न रपेश वलके यांनी प्रसिद्धी पत्रकात उपस्थित केला आहे. सदर मागणी लक्सात घेऊन प्रशासनाने त्वरित अद्यावत मतदार याद्या उपलब्ध कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे .