श्री.विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी
देसाईगंज,दि.२०/०१/२०२३
अतिदुर्गम,अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्ह्यातील प्रगत नगर पालिका म्हणून देसाईगंज नगर परिषदेचा नावलौकिक असला तरी चुकिच्या हातात सत्ता सुञे असल्याने अद्यापही आवश्यक त्या प्रमाणात शहराचा विकास होऊ शकला नाही. विकासात्मक दृष्ट्या देसाईगंज शहर अतिशय महत्त्वाचे असल्याने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी येत्या नगर परिषदेच्या निवडणुकीची कमान हातात घेणार असल्याचे सुतोवाच माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार VIJAY WADETTIWAR यांनी केले.
ते देसाईगंज येथे आले असता रासेकर ट्रक्टर्स यांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.यावेळी देसाईगंज तालुका काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र बुल्ले,माजी सभापती परसराम टिकले,उपाध्यक्ष नितिन राऊत,युवक काँग्रेस शहर अध्यक्ष पिंकु बावणे, वामन सावसाकडे,राजु रासेकर,डाॅ.चंद्रकांत नाकाडे, नरेंद्र गजपुरे,जावेद शेख, गणेश रासेकर,तालुका महासचिव पंकज,भीमराव नगराळे,मनोज ढोरे,छगन सडमाके,दिलीप घोडाम, सागर वाढई,नरेश लिंगायत आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
देसाईगंज शहर गडचिरोली जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ असुनही अद्याप शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मागील दहा वर्षापासून सत्तेत असलेल्या सत्ताधाऱ्यांनी कुठल्याही लोकाभिमुख योजना राबविल्या नसल्याचे स्पष्ट दिसुन येत आहे.आश्वासनांच्या खैरातीत नागरिकांची दिशाभूल करणे काही लोकांचा धंदाच झाला असुन जोडोतोडो चे राजकारण करून सत्ता बळकावणे व त्या माध्यमातून आपल्या पोळ्या भाजून घेणेच सुरु असल्याने अशा संधीसाधु लोकांना ओळखून आपल्या शहराच्या विकासासाठी नागरिकांनी पाऊल पुढे टाकणे गरजेचे झाले आहे.
शहराच्या मुख्य बाजारपेठेचा गंभीर प्रश्न अद्यापही कायम असुन शहरात साध्या पार्किंगची व्यवस्था करण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आल्याने याचा जबर फटका येथील व्यापारी,नागरिकांना बसत असल्याचे वास्तव आहे.येथील कपडा बाजार,किराणा, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल्स व्यवसाय सर्वदुर परिचित असल्याने या ठिकाणी खरेदीसाठी लांबदुरुन येण्याचा लोकांचा कल पाहु जाता मुलभुत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. येथील नागरिकांनी नगर परिषदेची सत्ता काँग्रेसच्या हातात दिल्यास जातीने समस्या मार्गी लावणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थित काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्त्यांना देऊन मतभेद,मनभेद विसरून काँग्रेसींनी एकदिलाने संघर्ष करण्याचे आवाहन त्यांनी केले.