व्यक्तिमत्व विकास शिबिराची सांगता

श्री.विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर 

देसाईगंज,दि.२०/०३/२०२३

स्थानिक आदर्श कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आयोजित व्यक्तिमत्व विकास शिबिराचे समारोपीय कार्यक्रम संपन्न झाले.
या प्रसंगी मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकर कुकरेजा, मुख्य मार्गदर्शक आरती पुराम, रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी प्रा. निलेश हलामी , विद्यार्थी विकास विभाग प्रमुख डॉ.विठ्ठल चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून प्राचार्य डॉ.शंकरकुकरेजा म्हणाले की, विद्यार्थ्यानी आत्मविश्वासातून स्वयंप्रेरीत होऊन स्वतःचा विकास साध्य करण्यासाठी मनापासून प्रयत्न करावा. महाविद्यालयात या सहा दिवसीय शिबीरातून वेगवेगळ्या विषयांवर आयोजित प्रेरणादायी व्याख्यानातून नकीच आपल्या ज्ञानात भर पडेल त्या ज्ञानाचा अंगीकार करून जीवनात यशवंत, गुणवंत, व किर्तीवंत व्हाल अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे मुख्यमार्गदर्शक आरती पुराम म्हणाली, निरोगी आरोग्य व व्यक्तिमत्व विकास यांचा फार जवळचा संबंध आहे. आपण निरोगी जीवन जगण्यासाठी तंबाखू जन्य पदार्थ यापासून अलिप्त राहून समाजात जनजागृती केली पाहीजे. अलीकडे समाजात व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढलेले आहेत. त्यामुळेच अशा व्यक्तिमत्व विकास शिबीरातून विद्यार्थ्यांना समाजोपयोगी धडे दिली जात आहे. या शिबीरातून विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. मनुष्य निरोगीमय जीवन जगून यश संपादित करू शकते. जीवनात येणाऱ्या सर्व समस्यांवर मात करता येते. असे मौलिक विचार व्यक्त केले.
या शिबीरा दरम्यान आयोजित वेगवेगळ्या विषयांवर प्रेरणादायी व्याख्यानाची मांडणी प्रा. डॉ.विठ्ठल चव्हाण यांनी केले. सुञसंचालन प्रा. अमोल बोरकर तर आभार प्रा. निलेश हलामी यांनी मानले. याशिबीरात बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.