अन्याय, अत्याचाराविरुद्ध महिलांचा एकजुटीने संघर्ष काळाची गरज – शिवानी वडेट्टीवार

श्री.अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्युज जागर 

सिंदेवाही, दि.२९.०३.२०२३

हजारो महिलांची उपस्थिती – सिंदेवाही येथे “सन्मान कर्तुत्वाचा’ सत्कार सोहळा कार्यक्रम

प्राचीन काळातील रूढी परंपरांना तिलांजली देत कुटुंबप्रमुखासह खांद्याला खांदा लावून “चूल आणि मूल’ च्या पलीकडे जात महिलांनी आकाशात गरुड झेप घेतली. तर दुसरीकडे मात्र देशात मनोविकृतीने ग्रासलेल्या नराधमांनी आजही स्त्रियांवर अत्याचार अन्याय करणे सुरूच ठेवले आहे. अशा अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा उभारण्याकरिता सर्व महिलांनी एकजुटीने संघर्ष करावा ही काळाची गरज बनलेली आहे असे प्रतिपादन प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी केले. त्या सिंदेवाही येथे महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित “आदर नारी शक्तीचा सन्मान कर्तुत्वाचा’ या सत्कार सोहळ्याप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होत्या.

आयोजित कार्यक्रमास प्रामुख्याने अध्यक्ष म्हणून देवयानी इंटरनॅशनल स्कूल प्राचार्य शैलजा पाटील, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुनीता लाकडे, माजी जि. प. सदस्य रूपा सूरपाम, माय छोटा स्कूल नागपूर संचालिका चेतना खंडाळे, माजी प. स. सदस्य मंगला हटवादे तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष सीमा सहारे, शहराध्यक्ष प्रीती सागरे संघटिका लता गेडाम, माजी सरपंच मंदा चौकी, मंगला बोरकर, चंद्रकला बोडणे , तर प्रामुख्याचे मुख्य आकर्षण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जगात सर्वात कमी उंचीची नोंद असलेली नागपूर येथील ज्योती आमगे व चित्रपट अभिनेत्री तथा नाट्य कलाकार प्रियंका ठाकूर तसेच अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी जगातील कानाकोपऱ्यात आपल्या जिद्द चिकाटी व शैक्षणिक सामर्थ्याच्या भरोशावर सांगितले की महिलांनी आज घडीला साधलेली प्रगती आणि विविध क्षेत्रात उमटवलेली छाप यावर विस्तारित मार्गदर्शन केले. तर आजच्या आधुनिक तंत्रज्ञान युगात महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नसून केवळ समाजातील मनोविकृतीच्या नराधमांच्या वासनेचा शिकार होत असताना अशा समाजकंटकांना धडा शिकवण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन संघर्ष करावा असे आवाहन यावेळी मंचावरील उपस्थितांनी मार्गदर्शन करताना केले. यानंतर सिंदेवाही तालुक्यातील आशा वर्कर, आरोग्य सेवेतील परिचारिका, महिला सरपंच, नगरपंचायत महिला सफाई कामगार अशा एकूण 200 अधिक कर्तृत्ववान महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री नागपुरे (कावळे), नंदा नरसाळे, प्रास्ताविक सीमा सहारे तर आभार शहराध्यक्ष प्रीती सागरे यांनी मानले. यावेळी सिंदेवाही तालुक्यातील हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगरपंचायत सिंदेवाही- लोनवाही येथील सर्व नगरसेविका, तालुका काँग्रेसच्या महिला पदाधिकारी , तसेच काँग्रेस पक्षाच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनने अथक परिश्रम घेतले.

बॉक्स -ज्योती आमगे व अभिनेत्री प्रियंका ठाकूर यांना बघण्यासाठी उसळली गर्दी

सिंदेवाही तालुका महिला काँग्रेसच्या वतीने आयोजित “आदर नारी शक्तीचा सन्मान कर्तुत्वाचा’ या कार्यक्रमाप्रसंगी सिंदेवाही शहरात प्रथमताच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जगातील सर्वात कमी उंचीची अशी नोंद असलेली ज्योती आमगे तसेच प्रसिद्ध अभिनेत्री तथा नाट्य कलावंत प्रियंका ठाकूर यांचे कार्यक्रमात आगमन होताच बघणाऱ्यांची प्रचंड गर्दी उसळली. यावेळी ज्योती आमगे व अभिनेत्री प्रियंका ठाकूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केले.