श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्युज जागर
सिंदेवाही येथील घटना ; प्रवाशांनी मारल्या उड्या
राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या केबिनला अचानक आग लागल्याने, प्रवाशांनी खिडकीतून उड्या मारल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास सिंदेवाही जुन्या बस स्थानकावर घडली. Incident at Sindewahi आगीने रौद्र रूप धारण करण्यापूर्वीच क्षणाचाही विलंब न करता आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही.
ब्रह्मपुरी आगाराची चंद्रपूरकडे जाणारी एमएच ४० एक्यू ६०६८ क्रमांकाची बस सिंदेवाही येथील जुना बस स्थानक परिसरात दुपारी २.३० वाजताच्या सुमारास थांबली. या बसमध्ये प्रवाशी खचाखच भरुन होते. त्यामध्ये महिला प्रवाशांची संख्या सर्वाधिक होती. बसमधील बॅटरीच्या वायरिंगने अचानक पेट घेतल्यामुळे केबिनला आग लागली. केबिनमधून आगीचा धूर निघाला होता. हे दृश्य बस स्थानकावर प्रवाशी व चालक वाहकांना दिसल्याने त्यांनी आरडाओरडा करुन आतील प्रवाशांना सतर्क केले. लगेच पाण्याच्या बादल्या घेऊन आग विझविण्यास धाव घेतली. तोपर्यंत बसमधील प्रवाशांना याची काही कल्पना नव्हती. केबिनला आग लागल्याचे कळताच, आतील प्रवाशांनी जीवाच्या आकांताने मागील खिडकीतून उड्या मारून बाहेर पडले.




