ग्राहकांनी आपले अधिकार जाणून घेणे आवश्यक,कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना सुयोग्य मार्गदर्शन करावे

ग्राहकांनी आपले अधिकार जाणून घेणे आवश्यक,कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना सुयोग्य मार्गदर्शन करावे:-दीपक देशपांडे.
मूल, प्रतिनिधी….
ग्राहक संरक्षण अधिनियम १९८६ आणि २०१९ ची व्याप्ती इतकी मोठी आहे परंतू ग्राहक म्हणून आपल्याला मिळालेल्या अधिकारांची ग्राहकांना माहिती नसल्याने पदोपदी फसवणूक लुबाडणूक होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत असतात , आणि आपल्या देशातील मोठ्या प्रमाणात जनता शेती आणि शेती आधारित उद्योगात गुंतली असल्याने तसेच कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा या शोषित, पिडित शेतकऱ्यांशी नित्यनेमाने संपर्क येत असल्याने त्यांना योग्य मार्गदर्शन करीत ग्राहक कायद्याची माहिती त्यांना करुन देण्याची जबाबदारी आहे आणि ती सजग ग्राहक म्हणून विद्यार्थ्यांनी ती पार पाडावी असे आवाहन जागृत ग्राहक राजा संघटनेचे निमंत्रक, दीपक देशपांडे यांनी केले.

मूल तालुक्यातील गडीसुर्ला येथे कृषी महाविद्यालय मूल द्वारा आयोजित रासेयो वार्षिक साप्ताहिक शिबिरात *ग्राहक जागृती काळाची गरज* आणि बॅंकेच्या विविध योजनांची माहितीया विषयावर शिबिरार्थी विद्यार्थी आणि गावकरी यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून जागृत ग्राहक राजा संघटनेचे निमंत्रक दीपक देशपांडे, अशोक मैदमवार, तुळशीराम बांगरे, डॉ आनंदराव कुळे , मुक्तेश्वर खोब्रागडे. तसेच महाराष्ट्र बॅंकेचे मूल शाखेचे व्यवस्थापक रहमान साहेब , आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते हा कार्यक्रम प्राचार्य विष्णुकांत टेकाळे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
आपल्या वक्तव्यात ग्राहक म्हणजे काय? आणि ग्राहक संरक्षण अधिनियम निर्मितीचा इतिहास विशद करीत ग्राहक म्हणून आपल्याला मिळालेल्या अधिकारांची जाणीव नसते त्यामुळे सेवा देणारे अधिकारी असोत की विक्रेते आपले शोषण करण्याचा प्रयत्न करीत आहेत यावर अंकुश लावण्यासाठी जागरुक ग्राहक तयार होणे आणि त्यांचे संघटन निर्माण होण्याची गरज , आपल्या प्रबोधनातून व्यक्त केली, त्याचवेळी बॅंकांचे व्यवहार आणि साधी खाते पुस्तिका नोंद करण्यासाठी ग्राहकांना वारंवार चकरा माराव्या लागतात हे असे कां? असा प्रश्न देशपांडे यांनी आपल्या प्रबोधनातून उपस्थित केला,व ग्राहक आपल्या हक्कांप्रती जागरुक नसल्याने हा प्रकार खपवून घेतला जात असल्याचे स्पष्ट करीत कोणत्याही बॅंकेत खाते पुस्तिका नोंद करण्यासाठी ग्राहकांना वारंवार चकरा माराव्या लागू नये ही कायद्यात तरतूद असल्याचेही स्पष्ट केले.
अशोक मैदमवार यांनी , ग्राहक कायदा आणि ग्राहक संघटनेचे कार्य व फसवणूक यांबाबत विचार प्रास्ताविकातून मांडले , मुक्तेश्वर खोब्रागडे यांनी शेतकरी ग्राहक व बाजारपेठेतील फसवणूक प्रकारांची माहिती दिली , तुळशीराम बांगरे यांनी मुदतबाह्य वस्तू खरेदी केल्याने होणारे दुष्परिणाम अधोरेखित केले,तर डॉ आनंदराव कुळे यांनी फसवणुकीपासून सजगता बाळगणे किती आवश्यक आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
रहमान साहेबांनी बॅंकेच्या विविध योजनांची माहिती दिली आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे व पात्रता याबाबत मार्गदर्शन केले ,तर त्यांचे सहकारी महाडोळे यांनी कर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे यांची माहिती दिली.

ग्राहक जागृती काळाची गरज असल्याचे प्रतिपादन करताना ग्राहक संरक्षण कायद्याचे ज्ञान सगळ्यांना होणे किती गरजेचे आहे हे लक्षात घेऊन आम्ही पुन्हा एकदा आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करुच अशी ग्वाही देतानाच आमचे विद्यार्थी आणि प्राध्यापक मंडळी या कार्यक्रमातून त्यांना मिळालेल्या मार्गदर्शनाचा लाभ शेतकरी बांधवांना व आपल्या सोबतच इतरांना करुन देण्यासाठी प्रयत्न करतीलच अशी ग्वाही अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ विष्णुकांत टेकाळे यांनी दिली.

कार्यक्रमाची सुरुवात पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करुन व पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करीत करण्यात आली , यानंतर ग्राहक गीतगायन , पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला शिबिरात सहभागी विद्यार्थी, प्राध्यापक, तसेच गावकरी मंडळी सहभागी झाले होते.