श्री.अरुण बारसागडे, जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर
महानुभाव धर्माचे तिसरे अवतार श्री चक्रपाणी प्रभू महाराज यांनी सुमारे ९०० वर्षांपूर्वी हातात सूप व खराटा घेऊन वयाचे ६३ वर्षे अविरतपणे ग्रामस्वच्छता करून स्वच्छतेचा कृतीशील संदेश प्रत्यक्ष आचरणाद्वारे या भारतभुमीमध्ये सर्वप्रथम दिला. ग्रामस्वच्छतेचे आद्य प्रणेते श्री चक्रपाणी प्रभू महाराज ( कार्यकाल १०४२ ते ११४३) यांच्या महान अशा ग्रामस्वच्छता विषयक कार्याची माहिती प्रत्यक्ष आचरणाद्वारे जणमाणसांत रूजवण्यासाठी तसेच त्यांच्या समाजोद्धारक विचारांचा व जिवोध्दारक कार्याचा प्रसार व प्रचार करण्यासाठी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विचारमंच तळोधी (बा) व परिसर द्वारा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतरण दिन ते श्री चक्रपाणी प्रभू जन्मोत्सव या दोन महिन्यांच्या कालखंडामध्ये “राज्यस्तरीय श्री चक्रपाणी प्रभू ग्रामस्वच्छता अभियान” (वर्ष १० वे) राबविण्यात येत आहे.
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने दि.१८/०९/२०२२ रोज रविवारला श्री दत्त मंदिर देवस्थान पंच कमेटी व समस्त ग्रामवासीयांच्या सहकार्याने वाढोणा ता.नागभिड जि.चंद्रपूर येथील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चौकापासून राज्यस्तरीय श्री चक्रपाणी प्रभू स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली. महानुभाव धर्मप्रवर्तक सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी सुमारे १२ व्या शतकात संस्कृतची मिरासदारी मोडीत काढत मराठी भाषेचा गौरव केला. मराठी भाषेला धर्मभाषा व देववाणीचा दर्जा दिला. महानुभाव अनुयायांनी साडेसहा हजार ग्रंथाची विपुल साहित्यनिर्मिती करून मराठी भाषेचे संवर्धन केले. त्यांच्या या कार्याचे स्मरण करून आद्यग्रंथ लीळाचरित्राचा सन्मान करण्यासाठी ग्रंथदिंडीद्वारे जनजागृती करण्यात आली.



