श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
ईस्टर वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या बल्लारपूर क्षेत्राच्या सर्व कोळसा खाणीत कार्यरत खाजगी चारचाकी चालकांनी आपल्या विविध ज्वलंत मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केले. यापूर्वी मान्य करूनही या खाजगी कामगारांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने संतापलेल्या कामगारांनी सास्ती टाउनशिप भागातील मुख्य महाप्रबंधक कार्यालय प्रवेशव्दारावर धडक देऊन मागण्या तातडीने मान्य करून ती प्रत्यक्षात अंमलात आणण्याची मागणी केली. या खाजगी कामगारांच्या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय कोयला खदान मजदुर संघाचे क्षेत्रीय अध्यक्ष नेते आर. शंकरदास, क्षेत्रीय सचिव विश्वास साळवे, कार्याध्यक्ष सुदर्शन डोहे, सुधीर यमराज, बंडू लांडे, होमदेव चन्ने, आसिफ शेख यांनी केले.
आज सकाळी नऊ वाजता कोळसा खाणीत कार्य करणारे सर्व चालक एकत्र आले आणि त्यांनी आज कोणतेही वाहन न चालविता आंदोलनाचा बिगुल फुंकला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणा दिल्या. या न्याय्य आंदोलनाला इंटक या कामगार संघटनेचे क्षेत्रीय अध्यक्ष आर. शंकरदास व सचिव विश्वास साळवे यांची साथ लाभल्याने आंदोलनाला जोरदार प्रतिसाद मिळाला. आज सकाळ पासून एकही चारचाकी कार, जीप, ट्रक खाणीत कामासाठी जाऊ शकली नाही. त्यामुळे अधिकारी आणि कामगारांची मोठी तारांबळ उडाली. अनेक वरिष्ठ अधिकारी स्वतःच्या गाडीने कोळसा खाण परिसर किंवा कार्यालयात गेले. गाड्याअभावी कामगारही प्रत्यक्ष कामावर उशिरा गेले. वेकोलिने अनेक खाजगी ट्रक, सुमो, जीप, कार भाडेतत्वावर घेतल्या आहेत. मात्र कंत्राटदार या गाड्या चालकांचे शोषण करीत आहेत. एवढेच नव्हे तर वेतनही योग्य प्रकारे दिले जात नाही. यासंदर्भात सरकारी नियम आहेत तसेच वेकोलिने या खाजगी चालकांसाठी नियम ठरवून दिले आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही आणि याविषयी वेकोलि अधिकारी दखल घेत नाहीत. अखेर आज या खाजगी चालक कामगारांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी काम बंदचे आंदोलन पुकारले.
या कामगारांनी सरकारच्या किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्यावे तसेच वेगवेगळ्या कंत्राटदारांकडे सर्व चालकांना सारखे वेतन द्यावे, बारा तास बंद करून आठ तास काम द्यावे, दर महिन्याला निर्धारित तिथीला वेतन व वेतन पत्रक द्यावे, रुग्णवाहिकेसाठी २४ तासांसाठी तीन चालक अशी मंजुरी असतांना दोन चालक ठेवून काम करविल्या जाण्याचा प्रकार बंद करावा, सर्व खाजगी चालकांचा नियमानुसार खात्यात प्राव्हीडेंट फंड जमा करावा, सर्व चालकांना ओळखपत्र, साप्ताहिक सुट्टी व वैद्यकिय रजेसह अन्य सुट्ट्या द्याव्यात, हजेरी रजिस्टर बी व सी मध्ये लावावी, चालकांना वैद्यकिय सुविधा द्याव्यात, बोनस द्यावा, सुरक्षा विषयक प्रशिक्षण द्यावे, रात्रकालिन भत्ता द्यावा, चालकांचा गट विमा करावा, चालकाचा मृत्यू झाल्यास १५ लाखाची मदत वेकोलिने द्यावी आणि कुटुंबातील एकाला नोकरी द्यावी अशाएकूण २५ मागण्या या आंदोलनाव्दारे करण्यात आल्या आहेत.
दरम्यान या आंदोलकांच्या नेत्यांना वेकोलि व्यवस्थापनाने चर्चेला बोलाविले असून अद्याप या आंदोलनाचा तिढा सुटलेला नाही. या आंदोलनात चालक अशपाक, कैलास आकापाका, सुनील टेकाम, संदीप लिंगमपल्लीवार, रोशन बोम्मावार, रवी गोट्टे, श्रीकांत दासर, इकबाल शेख, राजू मुच्छे, गौतम कांबळे, तिरुपती भूपेल्ली, रजनी कांत यांचेसह सुमारे दोनशे कंत्राटी चालक सहभागी झाले.