व्हॅलेंटाईन डे ‘च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करा- हिंदू जनजागृती समितीची मागणी

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

राजुरा, दि. ०९/०२/२०२३

 मागील काही वर्षात १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्याची पाश्चात्यांची कुप्रथा भारतातही रूढ झाली आहे. पाश्चात्यांनी व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या या विकृत संकल्पनेमुळे युवा पिढी अनैतिकतेच्या गर्तेत ओढली जात आहे. व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर प्रेमाचे बिभत्स सादरीकरण करत हल्ली एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्ये घडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तसेच या दिवशी होणाऱ्या पार्ट्या मधून युवक युवती यांच्यात मद्यपान धूम्रपान, अमली पदार्थांचे सेवन आदी अपप्रकारात प्रचंड वाढ झाली आहे. इतकेच नव्हे, तर या दिवशी संतती प्रतिबंधक साधनांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.हा सगळा किळसवाणा प्रकार पहाता या दिवशी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.

सद्यस्थितीत भारतात १८ मिनिटाला एक बलात्कार होत आहे. महिला वरील अत्याचारांची भयावह आकडेवारी समोर येत आहे. त्यामुळे यावर आळा घालणे गरजेचे झाले आहे.
या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी विविध आध्यात्मिक आणि समाजसेवी संघटना या ‘डे संस्कृतीला ‘ विरोध करत भारतीय प्रथांचे पालन करण्यासाठी आवाहन करत आहेत. एकीकडे विदेशात भारतीय संस्कृतीचे महत्व लक्षात घेत त्यानुसार आचरण करणाऱ्यांमध्ये वाढ होत असताना, भारतीय युवा पिढीला जाणीवपूर्वक पाश्चात्यांच्या कुप्रथामध्ये गुरफटून टाकण्याचे षडयंत्र ही मोठ्या प्रमाणात चालू आहे. भारतीय समाज व्यवस्था उत्तम राहावी आणि अनैतिक कृत्यामुळे होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसावा, यासाठी कायदा सुव्यवस्था राखण्यासह युवा पिढीचे प्रबोधन करण्याचीही नितांत आवश्यकता आहे
यासंदर्भात 14 फेब्रुवारी या दिवशी पोलिसांची विशेष पथके – गस्ती पथके नियुक्त करून महाविद्यालय परिसरात अप प्रकार करणाऱ्या समाजकंटकांना ताब्यात घेणे, वेगाने वाहने चालवणाऱ्या वर कारवाई करणे आधी उपाययोजना कराव्यात व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने महिलावर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण पाहता शाळा- महाविद्यालयाच्या परिसरात असे प्रकार होऊ नयेत, यासाठी मार्गदर्शक सूचना निर्देशित करण्यात याव्यात यासंबंधीचे निवेदन हिंदू जनजागृती समितीतर्फे दिनांक 08 /02/2023 रोजी तहसीलदार राजुरा यांना देण्यात आले. #newsjagar
निवेदन देताना हिंदू जनजागृती समितीचे  नामदेव उरकुडे, विनोद कोंगरे, मनोहर आइटलावार, शुभम ठाकरे, आकाश वाढई, कैलास कार्लेकर, प्रशांत साळवे उपस्थित होते.