श्री.भुवन भोंदे,प्रतिनिधी,न्यूज जागर
देसाईगंज : शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर अजूनपर्यंत धान खरेदीसाठी सुरुवात झाली नाही, तसेच जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाकडून खरेदी केंद्रांना उद्दिष्ट प्राप्त न झाल्याने तालुक्यात अजूनही कुठलेच धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. देसाईगंजच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धानाला भाव बरा मिळत असल्याने शेतकऱ्यांनी आपले धान कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डमध्ये आणणे सुरू केले आहे. १५ दिवसांपासून धानाची आवक दिवसेंदिवस वाढत असून, दरवर्षीपेक्षा यावर्षी शासकीय धान खरेदी केंद्रावर आवक कमी दिसणार आहे. देसाईगंज तालुक्यात यावर्षी धान पिकाचे उत्पादन चांगल्यापैकी झालेले आहे. हलक्या प्रतीचे धान महिनाभरापूर्वी शेतकऱ्यांच्या हाती आले आहे. सध्या धान काढणीचा हंगामसुद्धा अंतिम टप्प्यात पोहोचत आहे.
देसाईगंज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या चार ते पाच वर्षापासून शुकशुकाट दिसून येत होता. आज मात्र परिसर धानाने फुललेला दिसून येत आहे. याचा परिणाम देसाईगंज येथील इतर बाजारावरसुद्धा पडलेला आहे. शेतकऱ्यांनी विकायला आणलेल्या धानामुळेच आमचेसुद्धा व्यवसाय या शेतकऱ्यांवर अवलंबून आहेत, असे इतर व्यावसायिक म्हणत आहेत. शेतकऱ्यांच्या हाती पैसा आला तरच शेतकरी आपल्या संसारोपयोगी वस्तू देसाईगंज मार्केटमधून खरेदी करीत असतो. व्यवसाय फुलतो असे कापड, इलेक्ट्रॉनिक व इतर व्यावसायिकांचे म्हणणे आहे. धान व्यापारी तीन-चार वर्षांपासून धान मार्केटमध्ये येत नसल्याने चिंताग्रस्त झालेले होते. बऱ्याचशा व्यापाऱ्यांच्या दुकानावर धान काटा करणारे हमालसुद्धा नसायचे. शेतकऱ्यांचे धान येत नसल्याने हमालांनासुद्धा रोजगार नव्हता. त्या कारणाने हमालाचीसंख्यासुद्धा घटली होती. आज मात्र ती पूर्ववत झालेली आहे. एकंदरीत शासनाचा लेटलतीफ कारभार व उदासीनतेमुळेच व्यापाऱ्यांना मात्र आता सुगीचे दिवस आले आहेत. आता तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी धान खरेदी केंद्र लवकर सुरू करण्याची आवश्यकता आहे.