निजाम हा खलनायक मात्र इतिहासाकडे वस्तुनिष्ठ रीतीने पाहण्याची गरज – निशिकांत भालेराव

प्रकाश पोहरे, वामनराव चटप यांची उपस्थिती
राजुरा मुक्ती दिन सोहळा थाटात संपन्न

अरुण बारसागडे न्यूज जागर चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

निजाम प्रचंड श्रीमंत, उदार होता. मात्र त्याच्याकडे कुठलीही विकासात्मक दृष्टी नव्हती. निजामाने स्वातंत्र्याच्या बाबतीत खलनायकी भूमिका बजावली. मात्र निजामशाहीच्या अखेरच्या काळात त्याने आपली खलनायकी भूमिका पुसून काढण्याचा प्रयत्न करीत आपल्या देशाला सोने दान केले. आता निजामाच्या खलनायकीकडे न बघता निजामशाहीच्या इतिहासाकडे वस्तुनिष्ठ रीतीने पाहून मुल्यमापन केले पाहिजे, असे प्रतिपादन परभणी येथील जेष्ठ साहित्यिक, प्रसिद्ध ग्रामीण कथाकार व कवी इंद्रजित भालेराव यांनी केले.

राजुरा येथे दिनांक १७ सप्टेंबरला मा.सा.कन्नमवार सभागृहात राजुरा मुक्तीदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी माजी आमदार ॲड. वामनराव चटप, अविनाश जाधव, रीपाई नेते सिद्धार्थ पथाडे, सुदर्शन दाचेवार, रमेश नळे, रंभाताई गोठी, जयश्री देशपांडे, प्राचार्य दौलत भोंगळे, डॉ. उमाकांत धोटे, प्राचार्य डॉ. संभाजी वारकड आदी मान्यवर आणि सत्कारमूर्ती उपस्थित होते. सोहळ्याची सुरुवात दीपप्रज्वलन व स्वरप्रिती कला अकादमीच्या स्वागतगीताने झाली.

या सोहळ्यात राजुरा भुषण सत्कारमूर्ती राज्यात गुणानुक्रमे १३ व्या आलेल्या न्यायाधीश मा. ललिता टाकभौरे – करमनकर, बंजारा समाजातील पहिले वनपरिक्षेत्र अधिकारी देवराव पवार, जिवती तालुक्यातील पहिले पोलिस अधिकारी राहुल चव्हाण,. सामाजिक कार्यकर्ते अविनाश पोईनकर, पुणे विद्यापीठातून सुवर्ण विजेती रिया लेखराजानी आणि नीट परीक्षेत राज्यांतून ५ वा आलेला अनिरुद्ध डाखरे यांचा त्यांच्या परिवारासह शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र व साडी- चोळी, ज्ञानपुष्प व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला.

अध्यक्षस्थाना वरून बोलतांना जेष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे म्हणाले की, जगाचा पोशिंदा अत्यंत हलाकीचे जीवन जगत आहे, त्यामुळे तो आत्महत्या करू पहात आहे. अशाही परिस्थितीत त्याच्या शेतमालाला भाव नाही. म्हणून देशाला व मुक्तीसंग्राम लढ्यातून मराठवाडा- राजुरा या भागाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी शेतकऱ्याला अजूनही स्वातंत्र्य मिळाले नाही. सरकार कुठलेही असले तरी शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, हे दुर्दैव असल्याचे सांगून प्रकाश पोहरे यांनी कोविद काळात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या औषधांच्या बाबतीत लुटीचा तसेच केंद्र सरकारच्या कोविद काळातील धोरणाचा आपल्या आक्रमक शब्दात समाचार घेतला. यावेळी भालेराव यांनी एकापेक्षा एक सुंदर व श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या कविता सादर करून कार्यक्रमात एकच रंगत आणली. माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी मुक्ती संग्रामाच्या विविध गोष्टींना उजाळा देऊन राजुरा भुषण सत्करमुर्तीच्या कार्याचा आढावा घेत अभिनंदन केले. सत्कारमूर्ती राहुल चव्हाण, अविनाश पोईनकर व रिया लेखराजानी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

राजुरा मुक्तीदिन सोहळ्यासाठी पाहुण्यांना शासकिय विश्रामगृह येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण केल्यानंतर ढोल पथकाने सुंदर संचालन करीत कन्नमवार सभागृहापर्यंत रॅलीने आणले. येथे इनरव्हील क्लबच्या सदस्यांनी औक्षण करीत स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संभाजी वारकड, संचालन पूर्वा देशमुख व रजनी शर्मा आणि आभार प्रदर्शन संयोजक अनिल बाळसराफ यांनी केले. मानपत्रांचे वाचन वैशाली भोयर, कल्याणी मोहरील, स्वरुपा झंवर, उपप्राचार्य विजय आकनुरवार, प्रा. हेमचंद दूधगवळी, डॉ. विशाल मालेकर यांनी केले. राष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप सदावर्ते, अल्का सदावर्ते, गणेश बेले, कृष्णकुमार, संतोष कुंदोजवार, पियूष पालेवार, अर्चना शिंदे, कृतिका सोनटक्के, अनुष्का रैच, कविता शर्मा, कल्याणी गुंडावार, शुभांगी वाटेकर, प्राची चिल्लावार, वृषाली बोनगिरवार, वीणा देशकर, सुनीता कुंभारे, लता कुळमेथे, वनमाला परसुटकर, संध्या बाळसराफ, राधा दोरखंडे, ज्ञानेश्वर गंडाटे यांचेसह विविध संघटना व महिला संघटनांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थिती होती.