वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर 

गडचिरोली, ता.२२: गडचिरोली मुख्यालयापासून फक्त बारा किमी अंतरावर असलेल्या जेप्रा या गावाच्या एफडीसीएम क्रमांक 1 च्या जंगल परिसरात आज (ता.२२) सायंकाळी पाचच्या सुमारास वाघाने एका गुराख्याला ठार केल्याची घटना घडली.
वाघाच्या हल्यात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव नामदेव रामजी गेडाम (वय 70 ) असून हा व्यक्ती आपल्या घरातील जनावरे चारण्यासाठी जंगल परिसरात गेला होता. सायंकाळी पाचच्या दरम्यान जंगलात गेलेला नामदेव गेडाम परत न आल्याने गावकऱ्यांनी शोधाशोध सुरु केली होती. अखेर त्याचा मृतदेह जवळपास रात्री आठ वाजता जंगलात पाच किमी आतील भागात अढळून आला. खडतर मार्गाने जवळपास तीन किमी अंतर पायी चालत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह गावात आणला.
वाघाच्या तावडीत सापडलेल्या लोकांची यादी निरंतर वाढत असल्याने वनविभागाच्या वतीने वाघाचा बंदोबस्त कधी केला जातो याकडे लक्ष लागले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा आणि वनविभागाची यंत्रणा घटनास्थळी पोहचलेली होती. घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.