सुनीलने वाढवला जुनासुर्ला गावाचा अभिमान–

सुनीलने वाढवला जुनासुर्ला गावाचा अभिमान–
————————————-

गावातील पहीला इन्कम टॅक्स असिस्टंट-
————————————-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कुरमार समाजातील सुनीलचे घवघवीत यश
—————————————-

वैनगंगेच्या काठावर वसलेले प्राचीन जुनासुर्ला गाव कष्टकरी आणि मेंढपाळाचे वस्तीस्थान येथील मुखरु रामाजी पाटेवार ( मेंढपाळ ) यांचे चिरंजीव सुनील रेखा मुखरु पाटेवार हे नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC परीक्षेत 5 वे रँक प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले आहे. सुनील चे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनासुर्ला येथे तर दहावीपर्यंतचे शिक्षण श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूल जुनासुर्ला येथे झाले. त्यानंतर पदवीचे शिक्षण वाणिज्य शाखेत सरदार पटेल महाविद्यालय गंजवार्ड चंद्रपूर येथून पूर्ण करून थेट स्पर्धा परीक्षेकडे वळले. स्पर्धा परीक्षा देत असताना ,कोणत्याही परिस्थितीचा बागुलबुवा न करता जिद्दीने यशाची बीजे पेरली . यश नक्की मिळवू यावर त्याचा ठाम विश्वास होता. त्यामुळे तो आपल्या ध्येयापासून यत्कींचित ही डळमळला नाही. जुलै 2024 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या PSI परीक्षेत 99 टक्के यशस्वी होऊन सुद्धा 1 टक्का अपयश येऊन PSI होण्याचे स्वप्न भंगले. त्यामुळेच नवी प्रेरणा मिळाली.त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण होण्याची जिद्द सोडली नाही.
त्याने सतत पाच ते सहा वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी केली. जीवन म्हटल्यानंतर चढउतार यायचे त्याचप्रमाणे त्याच्या स्पर्धा परीक्षेच्या जीवनात सुद्धा अनेक चढउतार त्याने अनुभवले. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी त्यांनी स्वतःचे असे एक वेळापत्रक बनवले. जिद्द चिकाटी,मेहनत,नियोजन, संयम आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन या गोष्टीला प्राधान्य देऊन त्याने नुकत्याच घोषित झालेल्या निकालात पाचवी रँक पटकावून हे यश मिळवलेले आहे. कुरमार समाजातून जुनासुर्ला येथिल आजपर्यंत दोन व्यक्ती MPSC स्पर्धा परीक्षा पास झालेले आहेत. हे युवकांसाठी प्रेरणादायी आहे. याबद्दल सुनील आणि त्यांच्या कुटुंबियांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या यशाबद्दल जुनासुर्ला माझा अभिमान सेवाभावी संस्थेचे मुख्य प्रवर्तक किशोर आनंदवार , अध्यक्ष लक्ष्मण खोब्रागडे , मार्गदर्शक माणिक पाटेवार , उपाध्यक्ष तानाजी पेंदोर , सचिव मुकेश मद्रीवार, कोशाध्यक्ष अविनाश घोनमोडे व सर्व गावातील कर्मचारी सदस्यांनी अभिनंदन केले आहे.