आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत शेतकरी नोंदणीकरिता मुदत वाढ करा – मनोज अग्रवाल

श्री. श्याम यादव कोरची प्रतिनिधी, न्यूज जागर 

 

कोरची तालुका हा आदिवासी बहुल व कृषी आधारित तालुका असून तालुक्यातील नागरिकांना कुठलाही जोडधंदा नसल्यामुळे शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप पणन हंगाम 2022-23 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शेतकरी नोंदणी करिता मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी कोरची तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी यांना तहसीलदार यांच्या मार्फत निवेदनातून केली आहे.

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान व भरडधान्य खरेदी करिता ऑनलाइन पोर्टलवर शेतकरी नोंदणी करिता दिनांक 21 ऑक्टोंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु ई – पिक पाहणीच्या तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना सातबारे न मिळाल्याने या कालावधीत बऱ्याच शेतकऱ्यांची नोंदणी झालेली नाही त्यामुळे अनेक शेतकरी नोंदणीकरिता वंचित राहतील. तरी येणार्‍या दिवाळीच्या सणाची सुट्टी लक्षात घेता किमान 30 दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी जेणेकरून एकही शेतकरी वंचित राहणार नाही अशी मागणी यावेळी अग्रवाल यांनी केली आहे.