श्री.अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर
अभयारण्याची सुरक्षा धोक्यात, पाचही वनक्षेत्रात स्थायी अधिकाऱ्यांचा अभाव
कोठारी
चंद्रपूर वनप्रकल्प विभाग चंद्रपूर अंतर्गत असलेल्या झरण,कन्हारगाव-१,२,धाबा व तोहोगाव वनपरिक्षेत्रात स्थायी वनाधिकारी नसल्याने मागील काही महिन्यांपासून कन्हारगाव अभयारण्य वनक्षेत्राची सुरक्षा धोक्यात आली आहे.
कन्हारगाव अभयारण्य घोषित झाल्यानंतर या क्षेत्रातील अनेक वनअधिकारी व सुरक्षा कर्मचाऱ्याच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.वन विकास महामंडळातील चंद्रपूर वनप्रकल्प चंद्रपूर अंतर्गत झरण,कन्हारगाव-१,२,तोहोगाव व धाबा असे वनपरिक्षेत्र आहेत.या वनक्षेत्राचा कार्यभार सांभाळण्यासाठी स्वतंत्र वनाधिकारी नाहीत.मागील काही महिन्यांपासून या क्षेत्राचा प्रभार क्षेत्रसाहाय्यकाच्या खांद्यावर असल्याने येथील जंगल व वन्यप्राण्यांची सुरक्षा वेशीवर टांगण्यात आली आहे.येथील कर्मचाऱ्यांवर कोणाचेही वचक उरले नाही.वनकर्मचारी वाट्टेल तेव्हा येतो जातो.जंगलातील विडिंगसह अन्य कामे घरी बसून करण्यात आली.त्यातही प्रत्यक्ष काम न करणाऱ्या मर्जीतील मजुरांच्या खात्यात मजुरी तसेच न केलेल्या कामाची देयके तयार करून बँकेत जमा करून त्यांना बँकेत नेऊन पैसे निकासी करून स्वतःचे उखळ पांढरे करण्याचे व महामंडळाला आर्थिक चुना लावण्याचे काम सुरू आहे.या प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांची मूक संमती असल्याचे बोलल्या जात आहे.याबाबत प्रभारी वनाधिकाऱ्यास विचारणा केली तर आपले हात वर करून त्याबाबत आपण्यास कल्पना नसल्याचे सांगत लपवालपवी करून त्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करीत आहेत.
प्रभारी वनअधिकाऱ्यांचा कोणत्याही कर्मचाऱ्यांवर प्रतिबंध ,अटकाव उरला नाही.त्यामुळे अत्यंत संवेदनशील असलेल्या कन्हारगाव अभयरण्यातील वन्य प्राण्यांची सुरक्षा व मौल्यवान साग आदी वृक्षांच्या तसेच बांबू चोरीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झालेली आहे.या वन क्षेत्रात वन्य प्राण्यांच्या शिकारीत वाढ झाली असून असाच प्रकार आणखी काही महिने सुरू राहील्यास अभयारण्यातील वाघासह इतर प्राणी व मौल्यवान जंगल नामशेष होण्यास वेळ लागणार नाही.मार्कडा अभयारण्याची अवस्था आजघडीस प्राणीविरहित आहे तसेच भविष्यात कन्हारगाव अभयारण्य भविष्यात होण्यास उशीर लागणार नाही.जंगलाची सुरक्षा वाऱ्यावर सोडून वन कर्मचारी घरूनच कारभार व जंगल गस्त करीत असल्याचा प्रकार सद्या दिसून येत आहे.वनक्षेत्राचे कार्यालय मानमर्जीने उघडले जाते व पाहिजे तेव्हा बंद करण्यात येते.या क्षेत्राकडे कोणत्याही वरिष्ठ वनधिकाऱ्यांचे लक्ष नाही.या प्रकाराची दखल वेळीच न घेतल्यास सुसाट विना कामाने भ्रमंती करणाऱ्या वनकर्माच्या बेजबाबदार कामगिरीने अभयारण्य ओसाड होण्याची शंका वन्यप्रेमीकडून वर्तविण्यात येत आहे.