पुरस्कार प्राप्त सोनापूर (देश) ग्रामपंचायतीला ५० लाखाचा धनादेश

श्री.अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर

 

आर आर पाटील स्पर्धेचा पुरस्कार

आक्सापूर

गोंडपिपरी पंचायत समितीचे माजी सभापती तथा भाजपाचे जिल्हा सचिव दीपक सातपुते यांची संकल्पना आणि सरपंच जया सातपुते यांच्या अथक प्रयत्नातून सोनापुर (देशपांडे) गावचा चेहरामोहरा बदलला.सरपंचाच्या नेतृत्वात आर.आर.आबा पाटील सुंदर ग्राम जिल्हा पुरस्कार स्पर्धेत या गावच्या ग्रामपंचायतीने प्रथम पुरस्कार प्राप्त केला आहे.सदर पुरस्काराचे वितरण राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.यादरम्यान ५० लक्ष रुपयाचा धनादेश ग्रामपंचायतीच्या सुपूर्त करण्यात आले.

 

महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील मागासलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील सोनापूर (देशपांडे) गावच्या विकासाकरिता तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगडे यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे.त्यांच्या मार्गदर्शनात येथील पंचायत समितीचे माजी सभापती दीपक सातपुते यांनी आपली जन्मभूमी असलेल्या या गावाला विकासाच्या माध्यमातून जिल्ह्यात नावारूपास आणले.दरम्यान सोनापूर (देशपांडे) गावात झालेला विकास आणि घडलेला बदल प्रशासनाने प्रत्यक्षात हेरला.परीक्षणानंतर सुंदर ग्राम म्हणून या गावची निवड करण्यात आली.निवडीनंतर खऱ्या अर्थाने तेथील ग्रामस्थांच्या कष्टाची चीज झाली.गावाची जिल्ह्यात वेगळ्या स्वरूपाने ओळख निर्माण झाली असून शासनाने देखील नुकतेच सोनापूर (देशपांडे) गावाला जिल्हा पुरस्कार प्रदान करून तेथील लोकांचा गौरव केला आहे.पुरस्कार प्रदान करताना सोनापूर (देशपांडे) ग्रामपंचायतीला ५० लक्ष रुपयाचा धनादेश प्राप्त झाला.या सोहळ्याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे,गोंडपिपरी पंचायत समितीचे माजी सभापती दीपक सातपुते उपस्थित होते.शासनाचा हा पुरस्कार सरपंच जया दीपक सातपुते,ग्रामसेवक वाकडे,ग्रा.पं.सदस्य विनोद पाल,साईनाथ कांबळे,मनिषा चौधरी आणि रोजगार सेवक लक्ष्मण तिमाडे यांनी स्वीकारला.