सिरोंचा तालुक्यात अस्वलाची शिकार , वनविभागाचे दुर्लक्ष

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर

सिरोंचा तालुक्यातील आरडा नियत क्षेत्रांतर्गत येत असलेल्या पेंटिपाका-पाटीपोचम्मा जंगल रस्त्यालगत अस्वलाचा मृतदेह आढळून आला. यात अस्वलाच्या चारही पायांचे पंजे व लिंग गायब असल्याने हा प्रकार शिकारीचा असल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे सिरोंचा वनविभागात आता शिकार करणारी टोळी सक्रिय झाली असल्याचे स्पष्ट होत आहे. सिरोंचा वनविभागात अवैध वृक्षतोड, वन्यप्राण्यांची शिकार सर्रास होत असतांना वनसंपदेच्या संरक्षणाची जबाबदारी असलेले वनविभाग दिवाळीच्या सुट्यात गर्क आहेत व वनविभागांतर्गत कार्यरत वनाधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहून कर्तव्य बजावित नसल्याने  वनतस्करांची मुजोरी वाढली आहे. अनेक महिन्यांपासून सिरोंचा वनविभागातील जंगल क्षेत्रात वनजमिनीवर अतितक्रमण करणे, मौल्यवान सागवानाची तस्करी करणे, यासाठी हजारो वृक्षांची कत्तल करण्याचे प्रकार सुरु आहे.  लाखों रुपयांची वनसंपदा नष्ट झाली आहे. यामुळे शासनाचा कोट्यावधीचा महसूलही बुडाला आहे. मात्र सिरोंचा वनविभागाच्या उपवनसंरक्षकांच्या दुर्लक्षित कारभारामुळे वनतस्करीचे प्रकार सुरुच आहेत.