आता प्रत्येक कामगाराला मिळणार हक्काचे घर , राज्य सरकारचा निर्णय

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

 

देशातील प्रत्येक व्यक्तीला अन्न वस्त्र निवारा यांची गरज असते. माणसाच्या जीवनातील या तीन वस्तू मिळाल्या तर माणूस सुखी होत असतो. प्रधानमंत्री यांनी 2022 पर्यंत प्रत्येक व्यक्तीला घर असे सांगितले होते. मात्र आजही ग्रामीण भागातील अनेक नागरीकाना हक्काच्या घर मिळालेले नाही. त्यामुळं हे आश्वासन हवेतच विरत आहे की काय असे मत ग्रामीण भागातील ज्या व्यक्तींना अजूनही हक्काचे घर मिळाले नाही ते नागरीक असा प्रश्न करताहेत त्यामुळं आजही अनेक नागरीक आपल्याला हक्काचे घर कधी मिळेल या प्रतीक्षेत वाट पाहत असून घरकुल ची यादी कधी मंजूर होईल जी साहेब असा प्रश्न ग्रामीण भागातील नागरीक ग्रामपंचायत मध्ये येऊन विचारणा करीत असतात .

राज्यातील नोंदणीकृत कामगारांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत नोंदणीकृत कामगारांना घरकुले देण्यात येणार आहेत. राज्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी हा निर्णय जाहीर केला.

प्रधानमंत्री यांनी 2022 पर्यंत प्रत्येक नागरिकांना घर असे आवाहन केले होते. त्यानुसार पंतप्रधान घरकुल योजना ही प्रत्येक नागरिकांना मिळणार घरकुल योजना आहे. आता पर्यंत अनेक नागरिकांना घरकुल मिळाले आहेत. प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत घरकुलासाठी अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळते. त्यात कामगार विभागाकडून प्रत्येक घरकुलासाठी दोन लाख रुपये देऊन नोंदणीकृत कामगारांना घरकुल देणार असल्याचे मंत्री सुरेश खाडे यांनी सांगितले.

नोंदणीकृत कामगारांना घरकुलांच्या जागेसाठी गायरान, गावठाण तसेच एमआयडीसी मधील जमिनींचे सर्वेक्षण केले जात असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळं आता नोंदणीकृत कामगारांनाही घरकुल योजनेच्या माध्यमातून प्रत्येक नोंदणीकृत कामगारांना हक्काचे घर मिळणार आहे.

केवळ 1 रुपया नोंदणी फी

पूर्वी कामगार नोंदणीसाठी 25 रुपये नोंदणी फी होती. आता ही फी कमी करुन केवळ 1 रुपयांत कामगार नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक कामगारांनी नोंदणी करण्याचे आवाहन डॉ. खाडे यांनी केले आहे. कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन बांधण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान 1 ते 2 एकर जागा लागणार आहे. शक्यतो ‘एमआयडीसी’ सारख्या ठिकाणी जागा निवडण्याच्या सूचनाही डॉ. खाडे यांनी केल्या असल्याचे समजते.