देसाईगंज शहरातील सर्व वार्डातील रस्ते न बनविल्यास आंदोलनाचा इशारा- अनिल साधवानी

श्री.भुवन भोंदे , प्रतिनिधी,न्यूज जागर

दि.२०/११/२०२२२

देसाईगंज

देसाईगंज शहरातील  सिंधी कॉलनी व कन्नमवार वॉर्डातील नंदनवन कॉलनीत मुलभूत सुविधा अद्यापही पोहोचल्या नाहीत. त्यामुळे या वॉर्डाकडे लक्ष देऊन रस्त्याची कामे व सुविधा उपलब्ध करून द्यावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा अनिल साधवानी यांनी दिला आहे.

शहरातील माता वॉर्ड, आंबेडकर वॉर्ड, भगतसिंग वॉर्ड, जुनी वडसा वॉर्ड, राजेंद्र वॉर्ड, कस्तुरबा वॉर्ड, किदवाई वॉर्ड या वॉर्डात अतिशय कमी रुंदीचे रस्ते आहेत. आणि या वॉर्डातील बऱ्याच रस्त्यांची रुंदी कमी असल्यामुळे या रस्त्यावरून चारचाकी वाहन, मालवाहक वाहन जातच नाही. तरी देखील या सर्व वॉर्डातील कमी रस्त्यांना सुद्धा सिमेंट काँक्रीट चे बनवून या वार्डाच्या नगरसेवकांनि उत्कृष्ट कार्य केल्याचे श्री. अनिल साधवानी यांनी सांगितले 

पण नगरपरिषद प्रशासनाला शहरात सर्वात जास्त कर देणाऱ्या सिंधी कॉलनीकडे नेहमीच दुर्लक्ष का केले जाते?  सिंधी कॉलनीत बऱ्याच वर्षांपासून एकही विकासाचे काम दिसत नाही. येथे मागील १० वर्षात ना रस्ते, ना नाली, ना स्वच्छता तर नुकताच झालेल्या पावसामुळे सिंधी कॉलनीतील डांबर रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. येथील रस्त्यात खड्डे आहेत कि खड्ड्यात रस्ता  ? हा प्रश्न जनतेला निर्माण झाला आहे.असा संतप्त सवाल श्री.अनिल साधवानी यांनी केला आहे

कन्नमवार वॉर्डातील नंदनवन कॉलनीत २२ वर्षांपासून लोक राहत आहेत. या कॉलनीतील लोकांकडून किती तरी वर्षांपासून नगरपरिषदेकडून कर प्रशासनाकडून आकारणी केली जाते. पण अद्यापही इथे मूलभूत सुविधा प्रशासनाकडून दिली जात नाही. म्हणून या वॉर्डातील लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. वॉर्डात कुठलेही काम न झाल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय वॉर्डातील लोकांनी घेतला आहे

नागपूर, ब्रम्हपुरी, कुरखेडा, आरमोरी, गडचिरोलीकडे जाण्यासाठी मालवाहक वाहनांना एकमेव मार्ग म्हणजे ब्रम्हपुरी बायपास रोड आहे. या मार्गावरून जाणाऱ्या जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग जो आंबेडकर शाळेजवळून आहे. तो अतिशय दुरवस्थेत  असून धोकादायक झाला आहे. तिथे बरेच अपघात देखील झाले आहेत. तरी या रस्त्याचा कामाला गती देऊन लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी अनिल साधवानी यांनी निवेदनातून केली आहे.