गोंडपिपरीच्या धम्म मेळाव्यातून आंबेडकरांनी केला जातीव्यवस्थेविरुद्ध प्रहार

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

गोंडपिपरी,दि.१०/१२/२०२२

शहर सजले,बांधवांच्या अलोट गर्दीने रेकॉर्ड मोडला

चार लोकांपासून सुरू झालेला हा विचाराचा लढा अजूनही संपला नाही.जातीच्या नावाने आज देखील पुजारी राहतात.बुद्धीला नाहीतर जातीलाच श्रेष्ठत्व आले आहे.अशावेळी हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू असताना हिम्मत दाखवा आणि व्यवस्थेविरुद्ध बोला,असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी समाजबांधवांना केले.त्यांनी आरएसएस पुढे प्रश्न उपस्थित करून त्यांना देखील खुल्या चर्चेसाठी आमंत्रित केले.गोंडपिपरी येथील भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित विराट अशा धम्म मेळाव्यातून आंबेडकरांनी व्यवस्थेविरुद्ध जोरदार प्रहार केला.

गोडपिंपरी येथील जनता महाविद्यालयाच्या पटांगणावर धम्ममेळाव्याचे आयोजन करण्यात आले.सदर मेळाव्याला हजारो बांधवांचा समूह एकवटला.सकाळपासून दुरूनवरून समाजबांधव ज्या त्या साधनांनी कार्यक्रमाला हजेरी लावली.चद्रपुरसह गडचिरोली जिल्हा आणि लगतच्या तेलंगणा राज्यातून देखील मोठ्या प्रमाणात अनुयायी यावेळी दाखल झाले.दिल्ली येथील भदंत करुणाकर महाथेरो यांच्या उपस्थित गोंडपिपरी शहरातील मुख्य मार्गावरून रॅली काढण्यात आली.बँडच्या तालावरील समता सैनिक दलाचे पथसंचलनात निघालेल्या या धम्म रॅलीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.मेळाव्याचे औचित्य साधून गोंडपिपरी शहर तोरण पताक्यांनी सजले होते.परिसर निळामय झाला होता.तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा मेळावा एवढ्या व्यापकतेनी संपन्न झाला.कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भदंत करुणाकर महाथेरो,माजी राज्यमंत्री रमेश गाजबे,आदिवासी समूहाचे विचारवंत विनायक तुमराम,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदीप करपे,वंचितचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष दिलीप चौधरी,छाया कुरुडकर,चिवंडा येथील चांदेकर बंधू यांची उपस्थिती होती.कार्यक्रमादरम्यान आंबेडकर पुढे म्हणाले,दर पाच वर्षांनी शिक्षणाचे पॅटर्न बदलल्या जात आहेत.त्यामुळे येणारी पिढी पोखरत आहे.सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणा-यांना सरसकट जेलमध्ये टाकण्याची व्यवस्था निर्माण झाली आहे.हा प्रकार लोकशाहीसाठी घातक असून या लोकशाही देशात हुकूमशाहीची बीजे रोवली जात आहेत.आपला लढा मानसिकतेच्या विरुद्ध आहे.तो मिळून लढावा लागेल.नोटबंदीचा अधिकार सरकारला आहे की रिझर्व बँकेच्या गव्हर्नरला असा प्रश्न खुद्द न्यायालयानेच विचारल्यानंतर आता त्या निर्णयाची वास्तव स्थिती लवकरच समोर येईल.कार्यक्रमात समाजातील कर्तुत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.सायंकाळी औरंगाबाद येथील अल्बम सिंगर कुणाल व-हाडे यांच्या संगीताचा कार्यक्रम पार पडला.धम्म मेळाव्याच्या सोहळ्याचे प्रास्ताविक कमलेश निमगडे यांनी केले.संचालन सचिन फुलझेले तर उपस्थितांचे आभार कोमल खोब्रागडे यांनी मानले.