आणि वनमंत्र्याच्या निर्वाचन क्षेत्रातील आदिवासी गावांचा इको सेन्सिटिव्ह झोनला नकार

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

▪️आदिवासी बांधव रस्त्यावर उतरणार; आदिवासी बांधवांचा जन आक्रोश

▪️आदिवासी संस्कृती नष्ट होण्याच्या मार्गावर

पोंभूर्णा (ता. प्र. )
दिनांक:-२४/डिसेंबर.

कन्हाळगाव अभयारण्यालगत असलेल्या पोंभूर्णा तालुक्यातील तीन गावांचा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये समावेश होणार असल्याने वनग्राम असलेल्या देवई,केमारा,भटारी या गावातील ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. तसा नकार असल्याचा ठराव केमारा ग्रामपंचायतने शासनाला कळविला आहे. मात्र वनविभागाच्या वतीने बैठका घेऊन तीन्ही गावाची मनधरणी केली जात आहे. मात्र इको सेन्सिटिव्ह झोनमुळे या तिन्ही गावातील आदिवासींची संस्कृती ऱ्हास होणार असल्याचे चित्र दिसत आहे. पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असलेली घरे व कसत असलेल्या जमीनी जाणार या भितीने इको सेन्सिटिव्ह झोनला ग्रामस्थांनी नकार दर्शविला आहे.

अभयारण्याच्या नावाखाली या परिसरात इको टुरिझम,होटेल व्यवसाय,रिसार्ट सारखी वर्दळ राहणार आहे.यात आदिम संस्कृती नष्टच होणार आहे.या भागाला ऐतिहासिक महत्त्व आहे.प्राचीन धरोहर या भागात विराजमान आहे.या ठिकाणी ९ व्या शतकातील मुंगाई देविचे मुर्तीशिल्प आहे या मुर्तीला आदिवासी समाज जंगो रायताळ(अग्नी रायताळ)असे संबोधतात.येथील जंगलात सिद्धेश्वर शिवपिंडी होती ती चोरीने गेली असल्याचे सांगितले जाते,येथे आदिवासींचा बडादेव आहे तसेच गोंड राज्याची गढी येथे अस्तित्वात आहे.हि धरोहर इको सेन्सिटिव्ह झोनमुळे नष्ट होणार आहे.मात्र या गावांना काहीच होणार नसल्याची आश्वासने शासनस्तरावरून दिली जात आहे.शासनाच्या या दुटप्पी भूमिकेच्या निषेधार्थ व इको सेन्सिटिव्ह झोनची अधिसूचना मागे घ्यावी या प्रमुख मागणीला घेऊन पर्यावरण प्रेमी विलास मोगरकार व तिन्ही गावच्या गावकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.

वनविभागाने होणाऱ्या आंदोलनाचा धसका घेत गावातील लोकांची बैठक घेतली होती मात्र इको सेन्सिटिव्ह झोन रद्द करणार हे स्पष्ट न झाल्यामुळे गावकरी व वनविभागामध्ये तिढा कायम आहे.यावर जिल्हाधिकारी यांनीही पोंभूर्ण्यात झालेल्या बैठकीत भाष्य केले नाही.त्यामुळे देवई,केमारा,भटारी हे आदिवासी गावे दहशतीत आहेत.
त्यामुळे इको सेन्सिटिव्ह झोन आम्हाला नकोच असा पवित्रा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.

केमारा ग्रामपंचायत अंतर्गत भटारी,केमारा,देवई गावातील जंगलात राहून आपली संस्कृती,कला,इतिहास,परंपरा, बोली-भाषा, देव-गोत्र हि आदिवासींची संस्कृती अबाधित असतांनाच इको सेन्सिटिव्ह झोनचे गाजर दाखवण्यात येत असून त्यांच्या जीविकेवर,परंपरागत वनहक्काच्या जमिनी,वनावर अवलंबून असलेल्या छोट्या व्यवसायांवर संकट ओढणार आहे.

चिंतलधाबा येथील काही लोकांच्या जमीनी इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये जाणार आहेत.तरी सुध्दा इको सेन्सिटिव्ह झोन लागू करण्याच्या संदर्भात ग्रामपंचायतने सकारात्मक ठराव दिलेला आहे.या ठरावाबाबत येथील ग्रामस्थांना माहितीच नसल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे.

चिंतलधाबा व केमारा ग्रामपंचायतने दिलेला ठराव आम्ही वरिष्ठांकडे पाठविला आहे. केमारा ग्रामपंचायतने ठरावात नकार कळविला असून चिंतलधाबा ग्रामपंचायतने सकारात्मक ठराव दिलेला आहे.
                                                                         –फणिंद्र गादेवार,वनपरिक्षेत्र अधिकारी पोंभूर्णा.