श्री.विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
देसाईगंज,दि.२१/१२/२०२२
“द्वितीय महायुद्धात भारताने ब्रिटिशांना सहकार्य करू नये यासाठी सुभाषचंद्र बोस यांनी प्रखर विरोध केला, परिणाम स्वरूप त्यांना बंदी करून नजरकैद केले, त्यातून चतुराईने सुटका करून ते जर्मनीला गेले. आझाद हिंद सेनेचे संस्थापक रासबिहारी बोस यांनी त्यांना १९४३ मध्ये जपानला बोलवून आझाद हिंद सेनेची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. ब्रिटिश साम्राज्या पासून मुक्ती मिळविण्यासाठी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून व जपानच्या सहकार्याने अंदमान निकोबार भूप्रदेश ब्रिटिश साम्राज्यातून मुक्त केले. ३० डिसेंबर १९४३ ला पोर्ट ब्लेअर येथे सुभाषचंद्र बोस यांनी प्रथम तिरंगा फडकवला. स्वातंत्र्य लढ्यासाठी सुभाषचंद्र बोसांचे कार्य अलौकिक व दिशा देणारे ठरले.” असे मार्गदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ जयदेव देशमुख यांनी केले. ते महाविद्यालयात भारत माता व सुभाषचंद्र बोस यांच्या अलौकिक कार्यांवर प्रकाश टाकताना व अभिवादन करताना बोलत होते.
“ब्रिटिश साम्राज्याला नमवून अंदमान निकोबार भूमीवर आझाद हिंद सेनेचे सरसेनापती सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले आणि ३० डिसेंबर १९४३ रोजी त्यांनी प्रथम तिरंगा फडकवून संपूर्ण भारत भूमीला स्वातंत्र्य प्राप्तीसाठी एक पाऊल पुढे पडले. स्वातंत्र्य लढ्यात सुभाषचंद्र बोस यांची भूमिका अत्यंत मोलाची होती. शेवटी १९४७ मध्ये भारत भूमी स्वतंत्र झाली. असे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ श्रीराम गहाने यांनी सांगितले.
कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शंकर कुकरेजा यांचे मार्गदर्शनात सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित केला होता. यासाठी संपूर्ण प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱी उपस्थित संपन्न होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. रमेश धोटे यांनी तर पाहुणे व उपस्थितांचे आभार प्रा. निलेश हलामी यांनी मानले.