विद्यार्थ्यांनो कलांना व्यावसायिक स्वरूपात विकसित करा – डॉ शंकर कुकरेजा

loknryutta spardha
loknryutta spardha

श्री.विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर

देसाईगंज,दि.३१/०१/२०२३

आदर्श कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन लोकनृत्य स्पर्धेचे यशस्वी आयोजन

स्पर्धेकडे स्पर्धा म्हणूनच बघितले पाहिजे. स्पर्धेत उतरताना प्रत्येक सहभागी सदस्याने सर्वोत्कृष्ट कला सादर करतानाच सांघिक प्रदर्शनावरही जोर दिला पाहिजे. समूह नृत्य स्पर्धेत चेहऱ्यावरील हावभाव, लयबद्धता व समन्वय या मुद्द्यांना फारच महत्त्व असते. ग्रामीण भागातील विद्यार्थीसुद्धा विविध कलागुणांनी संपन्न असून त्यांनी त्या कलांना व्यावसायिक स्वरूपात विकसित करावे. स्पर्धेमध्ये खिलाडू वृत्तीने सहभागी व्हावे. व नवीन कलागुण आत्मसात करावेत, असे विचार प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा यांनी व्यक्त केलेत.
नूतन शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन लोकनृत्य स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर प्राध्यापक डॉक्टर जे पी देशमुख, प्रमुख, सांस्कृतिक विभाग हे होते. त्यांनी आपल्या मनोगतात स्पर्धा आयोजनाच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. या स्पर्धेत बारा महाविद्यालयाच्या संघांनी सहभाग नोंदवत विविध लोकनृत्यंवर दर्जेदार नृत्य सादर केलेत. अतिशय चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत चिंतामणी विज्ञान महाविद्यालय, पोंभुर्णा जि.चंद्रपूरच्या संघाने प्रथम स्थान प्राप्त केले. त्या संघाला रुपये 5000 रोख स्मृतीचिन्ह व पथकात सहभागी सर्व नृत्य विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. द्वितीय स्थान गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय कुरखेडा जिल्हा गडचिरोली च्या संघाने पटकाविले त्यांना रोख रुपये 3001 स्मृतिचिन्ह व सहभागाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तर तृतीय स्थान श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा जिल्हा चंद्रपूरच्या संघाने पटकाविले त्यांना रोख रुपये 2001 स्मृतिचिन्ह व सहभागाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले इतर सहभागी पथकातील विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री आशिष मुळे, श्री पराग सिडाम,नृत्य मार्गदर्शक एबीसी डान्स अकॅडमी, ब्रह्मपुरी, कु मोनाली साखरे,मोहिनी डान्स अकॅडमी, देसाईगंज हे उपस्थित होते. या स्पर्धेचे संपूर्ण सूत्रसंचालन आंतर महाविद्यालयीन कार्यक्रम आयोजन प्रमुख प्रा डॉ हितेंद्र धोटे यांनी केले. यावेळी काही स्पर्धक विद्यार्थी, नृत्य पथकाचे प्रभारी प्राध्यापक व परीक्षकांनी स्पर्धेच्या पारदर्शी व यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालयावर स्तुतीसुमने उधळलीत. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी स्वयंसेवक आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.