वाघाच्या हल्यात जखमी झालेल्या गुराख्याचा मृत्यु

मूल

वाघाच्या हल्यात काल जखमी झालेल्या मूल तालुक्यातील करवन येथील गुराख्याचा मृत्यु झाला आहे. दरम्यान वनविभागाच्या वतीने ५० हजार रूपयाची तातडीची मदत देण्यात आली आहे. भाऊराव वातु गेडाम (५५) रा. करवन असे मृत्यु पावलेल्या गुराख्याचे नांव आहे. काल मृतक भाऊराव गेडाम हा मारोडा बिट क्र. २ मधील घनदाट आणि गावापासून ७ किलोमीटर अंतरावर जंगलात गुरे चारण्यास गेला होता. दरम्यान दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने म्हशीवर हल्ला करून ठार केले. दुसऱ्या म्हशीवर हल्ला करताच गुराखी भाऊराव ओरडु लागला. त्याचक्षणी वाघाने त्याचेवर हल्ला करून जखमी केले. सदर घटनेची माहीती ग्रामस्थांसह वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहीत होताच त्यांनी घटनास्थळ गाठले. जखमी भाऊराव गंभीर शिवाय घटनास्थळ दुर्गम, लांब व घनदाट असल्याने कावडीच्या मदतीने त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर ब-याच उशीराने जखमी भाऊराववर प्राथमिक उपचार करून तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविले. परंतु उपचारा दरम्यान आज (१८) दुपारी ११.४५ वा. भाऊराव मृत्यु पावला. मृत्युपश्चात वनविभागाच्या वतीने मृतकाच्या वारसदाराला ५० हजार रूपयाची आर्थीक मदत देण्यात आली.