बोंडाळा बुज. शाळा तालुक्यात प्रथम
नवरत्न स्पर्धेत प्रथम क्रमांकाची पाच बक्षीसे
मूल : मूल तालुका स्तरीय नाविन्यपूर्ण नवरत्न स्पर्धेत जि. प. उच्च प्राथमिक शाळा बोंडाळा बुज.ने प्रथम क्रमांकाचे पाच बक्षिसे व व्दितीय क्रमांकाचे एक बक्षीस पटकावून तालुक्यात अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
शैक्षणिक क्षेत्रात अतिशय प्रतिष्ठेचे समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेत सात केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक विभागातून १२६ स्पर्धकांनी भाग घेतला. त्यात सर्वाधिक बक्षीसे जिंकून बोंडाळा बुज. शाळा अव्वल राहिली. प्राथमिक विभागातून स्वराली चुदरी हिने स्वयंपूर्ण भाषण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर माध्यमिक विभागातून प्रभात नागापूरे याने स्वयंपूर्ण भाषण स्पर्धेत अव्वल राहिला. समीक्षा पाल हिने वादविवाद व स्मरणशक्ती या दोन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीसे मिळविली. लावण्या चुदरी हिने स्वयंस्फूर्त लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. तर तिनेच सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. अशी प्रथम क्रमांकाचे पाच व द्वितीय क्रमांकाचे एक असे एकूण सहा बक्षिसे पटकावून बोंडाळा बुज. शाळा तालुक्यात अव्वल राहिल्याने शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तालुक्यातील गडीसुर्ला येथे पार पडलेल्या कार्यक्रमात सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना योग्य बक्षिसे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. शाळेला मिळालेल्या यशाबद्दल विद्यार्थी व शिक्षकांचे गटशिक्षणाधिकारी वर्षा पिपरे, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीरंग कुमरे, जयश्री गुज्जनवार, केंद्रप्रमुख गजेंद्र कोपुलवार, दयाराम भाकरे, वासुदेव आत्राम, प्रमोद कोरडे, सरपंच मुर्लीधर चुदरी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप पाल, उपाध्यक्ष ज्योत्स्ना झरकर यांनी अभिनंदन केले आहे. व जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. स्पर्धेच्या यशाकरिता शिक्षक शालीक गेडाम, वैशाली महाकारकर, चुन्नीलाल पर्वते, रजनी डोंगरे व मुख्याध्यापक किशोर उरकुंडवार यांनी मार्गदर्शन केले.