गडचिरोली, ता. ३० : राज्यासह देशातही शिवसेनेतून फुटलेला शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना यांचे प्रकरण न्यायालयात आहे. सध्याची एकूण परिस्थिती आता जनतेपासून लपून राहिलेली नाही. त्यामुळे देशात न्याय व्यवस्था जिवंत असेल, तर या प्रकरणी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना न्याय नक्की मिळेल, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केंद्र सरकारला लगावला.
स्थानिक इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या विविध प्रश्नांना आपल्या मिष्किल शैलीत उत्तरे देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, शिवसेनेतून फुटलेल्या शिंदे गटातील एका आमदाराने आम्ही शिवसेनेच्या न्यायालयीन प्रकरणाला आणखी पाच वर्षे लांबवू शकतो, असे वक्तव्य केले होते. यावरून सध्या सत्ताधाऱ्यांनी न्यायव्यवस्थाही नियंत्रणात आणली आहे की, काय, अशी शंका येत आहे. तरीही आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. म्हणून देशात खरच न्याय व्यवस्था जिवंत आणि स्वतंत्र असेल, तर न्याय नक्की मिळेल, असे ते म्हणाले. आपण जिल्ह्यात पक्षाचे क्रियाशील सदस्य तयार करण्यासाठी व त्यांचा आढावा घेण्यासाठी हा दौरा आखला आहे. जिल्ह्यात तीन हजार क्रियाशील सदस्य तयार करण्याचे लक्ष्य असल्याचेही ते म्हणाले.
त्यासोबतच जिल्ह्यातील पूरपरीस्थितीचाही आढावा घेतला. यंदाच्या पुरामुळे जिल्ह्याच्या दक्षिण भागात विशेषत: सिरोंचा तालुक्यात अवस्था गंभीर आहे. या तालुक्यातील गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने निर्माण केलेल्या महाकाय मेडीगड्डा धरणामुळे सिरोंचाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने येथील रखडलेले भूसंपादनाचे काम चार पट दराने मोबदला देऊन लवकर पूर्ण करावे आणि नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. या पत्रकार परिषदेला आमदार धर्मरावबाबा आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, शहराध्यक्ष विजय गोरडवार, युवक विभागीय अध्यक्ष नितीन भटारकर, प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुटे, प्रदेश संघटक युनूस शेख आदी उपस्थित होते.