अहेरीचे पोलिस निरीक्षकांना १ लाखाची लाच स्वीकारताना एसीबी कडून अटक

श्री.अनिल गुरनुले , तालुका प्रतिनिधी , न्यूज जागर 

 

अहेरी :- ट्रकने खनिजाची वाहतूक विनाअडथळा करु देण्यासाठी व एका गुन्हा दाखल प्रकरणात मदत करण्यासाठी वाहतूकदाराकडून १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज अहेरी येथील पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्याम गव्हाणे यांना रंगेहाथ पकडून अटक केली. या घटनेमुळे पोलिस विभागात एकच खळबळ माजली आहे.

तक्रारकर्ता नागेपल्ली येथील रहिवासी असून, तो गौण खनिजाची ट्रकद्वारे वाहतूक करीत असून यापूर्वी त्याच्यावर एका प्रकरणात अहेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सध्या तो सुरजागड येथील लोहखाणीतून ट्रकद्वारे कच्च्या लोखंडाची वाहतूकही करीत आहे. परंतु ही वाहतूक विनाअडथळा करु देण्यासाठी आणि दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलिस निरीक्षक श्याम गव्हाणे यांनी तक्रारकर्त्यास १ लाख रुपयांची लाच मागितली. परंतु लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार आज संध्याकाळी ४ वाजताच्या सुमारास या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून पोलिस ठाण्याच्या आवारात उभ्या असलेल्या शासकीय वाहनात १ लाख रुपये घेताना ठाणेदार गव्हाणे यांना रंगेहाथ पकडून अटक केली.

एसीबीचे नागपूर येथील पोलिस उपायुक्त राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक मुधकर गिते, तसेच चंद्रपूर एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीमती शिल्पा भरडे यांच्या नेतृत्वात नरेश नन्नावरे, संदेश वाघमारे, रवीकुमार ढेंगळे, वैभव गाडगे, सतीश सिडाम यांनी ही कारवाई केली.

कोणीही लाचखोर अधिकारी /कर्मचारी किंवा त्यांच्यातर्फे कोणी खाजगी व्यक्तीने लाचेची मागणी केल्यास लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे पोलिस निरीक्षक श्रीमती शिल्पा भरडे यांनी जनतेला आव्हाहन केले आहे