गडचिरोली जिल्हा प्रतिनिधि
सिरोंचा (जि. गडचिराेली), ता. १२ : तालुक्यातील झिंगानूर चेक नं. 2 अंतर्गत येणा-या लिंगापूर टोला येथील व्यंकटस्वामी कोंडागोर्ला यांच्या घरावर रविवार (ता. ११) रात्री १० वाजताच्या सुमारास वीज कोसळल्याने घरातील इलेक्ट्रीक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. प्राप्त माहितीनुसार, लिंगापूर टोला येथील व्येंकटस्वामी कोंडागोर्ला यांच्या घरावर रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास वीज कोसळल्याने घरातील टिव्ही, फ्रिज, कुलर, वीज मीटर, घरातील इलेक्ट्रीक बोर्ड जळून खाक झाले. त्यामुळे कोंडागोर्ला यांचे अंदाजे 60 हजारांचे नुकसान झाले आहे. घरात व्यंकटस्वामी कोंडागोल यांची पत्नी सुनीता कोंडागोर्ला, मुलगी श्रावणी, मुलगा कुणाल, असे चार जण होते. मात्र सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. घरातील इलेक्ट्रॉनिक साहित्याचेच एकूण 60 हजारांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती कोतवाल सुरेश गावडे यांना देण्यात आली. त्यांनी कोंडागोर्ला यांचे घर गाठून नुकसानीचा पंचनामा केला. शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे.