कॅप्शन : गडचिरोली : गडचिरोली पोलिस विभागाला मिळालेले पुरस्काराचे प्रमाणपत्र.
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
गडचिरोली, ता. ३० : पोलिसांच्या दादलोरा खिडकीच्या कार्याचा विचार करून गडचिरोली पोलिसांच्या दादलोरा खिडकी- सिंगल विंडो योजनेच्या अंमलबजावणीसाठी ‘आयआयपीए’इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनचा ‘कै. डॉ. एस. एस. गडकरी पुरस्कार २०२१-२०२२’ कताच जाहीर करण्यात आला. त्यानुसार पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांचा पोलिस दादालोरा खिडकीच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे. मंत्रालयाच्या समिती कक्षात पार पडलेल्या आयआयपीएच्या एमआरबीच्या ६७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
पोलिसांच्या दादलोरा खिडकीच्या माध्यमातून आदिवासी महिला, वृद्ध, दिव्यांग, विद्यार्थी, बेरोजगार युवक, आत्मसमर्पण, गडचिरोली जिल्ह्याच्या अंतर्गत भागात राहणारे नक्षलग्रस्त यांच्या विकासाचा गांभीर्याने विचार करून ‘पोलिस’ दादलोरा खिडकी (एक खिडकी योजना) नागरी कृती कक्ष, गडचिरोली अंतर्गत विविध पोलिस स्टेशन, उप पोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्र येथे गडचिरोली पोलिसांनी सुरू केली आहे. याशिवाय प्रकल्प प्रगती अंतर्गत जात प्रमाणपत्र, प्रकल्प विकास अंतर्गत विविध योजना, विविध प्रकारची कागदपत्रे, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, व्यावसायिक प्रशिक्षण व रोजगार योजना, अग्निवीर ऑनलाइन अर्ज, प्रकल्प कृषी समृद्धी, प्रकल्प शक्ती तसेच शासनाच्या विविध योजना दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील 2 लाख लोकांपर्यंत पोहोचवून नागरिकांना एकाच ठिकाणी लाभ मिळवून देऊन त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत प्रकल्प प्रगती अंतर्गत जात प्रमाणपत्र- 9390, विविध प्रकारच्या योजना प्रकल्प विकास-58831, विविध कागदपत्रे- 126448, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना-170, व्यावसायिक प्रशिक्षण व रोजगार योजना-6218, अग्निवीर ऑनलाइन अर्ज-173, प्रकल्प कृषी समृद्धी-12918, प्रकल्प शक्ती-1686 व इतर उपक्रम-10529 अशा एकूण 2,26,190 लोकांना विविध योजनांतर्गत गडचिरोली पोलिस दादलोरा खिडकीच्या माध्यमातून लाभ मिळाला आहे. भौगोलिक परिस्थितीचा विचार करता गडचिरोली पोलिसांसमोर अनेक आव्हाने आहेत. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील पोलिस स्टेशन, उप पोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्र या उपविभागीय कार्यालयांतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही आव्हाने स्वीकारून गडचिरोली पोलिसांच्या पोलिस दादलोरा खिडकीच्या माध्यमातून गरजू आदिवासी लोकांपर्यंत पोहोचून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी उत्कृष्ट काम केले आहे. ‘आयआयपीए’चा ‘कै. डॉ. एस. एस. गडकरी पुरस्कार २०२१-२०२२’ जाहीर झाल्यानंतर पोलिस अधीक्षक अंकित गोयल,यांनी गडचिरोली पोलिसांच्या दादालोरा खिडकीच्या वतीने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले असून भविष्यातही त्यांनी अशीच कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.