श्री.अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर
सावली ते गडचिरोली महामार्गावरील ज्योतिबा फुले चौकात भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघेही घटनास्थळीच ठार झाले. सदर घटना (दि. 18) रोजी सायंकाळी 6 वाजता च्या सुमारास घडली. देवानंद उर्फ बबलू दादाजी किनेकार (वय 28) व लक्ष्मीबाई आनंदराव किनेकार (वय 78) असे मृतकाचे नाव असून दोघेही सावली तालुक्यातील शिरसी येथील रहिवासी होते.
सविस्तर वृत्त असे की मृतक हे सावली येथील नातेवाईकांना भेटून दुचाकी क्र. एम एच 34 बिके झिरो 0145 या वाहनाने आपल्या स्वगावी सिरसी कडे जात असताना मागून येणारा ट्रक क्र. एम एच 49 – 1127 या वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. यात दुचाकीवरील दोघेही ट्रकच्या चाकाखाली आले. या धडकेत दुचाकीस्वार व त्याची आजी यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती सावली पोलिसांना देण्यात आली. सावली चे ठाणेदार अशिष बोरकर हे आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता सावलीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग सावली शहरातून जात असल्याने या मार्गावरून भरधाव वेगाने वाहने धावत असतात. अपघातास आळा घालण्यासाठी या मार्गावर गतिरोधक लावण्याची मागणी केल्या जात आहे.