*दोन दुचाकीस्वार व शेतकरी गंभीर जखमी तर एकाचा मृत्यू*
*कोरची – ता. प्रतीनीधी श्याम यादव
कोरची कुरखेडा हा राष्ट्रीय महामार्ग असून कोरची मुख्यालयापासून अंदाजे एक किलोमीटर अंतरावर 4 नोव्हेंबरला संध्याकाळी सातच्या सुमारास कोरची तालुक्यातील लेकुरबोडी येथून साक्षगंधाच्या कार्यक्रमातून येत असलेल्या दुचाकीस्वारांनी उभ्या बैलबंडीला धडक दिली. सदर बैलबंडी ही रस्त्याच्या कडेला होती व कोरची येथील शेतकरी चिंतामण केंवास हे आपले धानाचे पुंजणे बैलबंडी मध्ये भरत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने जबर धडक दिल्यामुळे केंवास हे गंभीररित्या जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार चिंतामण केंवास यांच्या सोबत त्यांचा नातू सुद्धा सोबत होता परंतु काही मिनिटापूर्वीच केंवास यांनी त्याला बाजूला होण्याचे सांगितले म्हणून सुदैवाने नातू सुरक्षित राहिला. चिंतामण यांना तातडीने गडचिरोली येथे रुग्णवाहिकेने पाठवण्यात आले व मेंदूमध्ये मार लागल्यामुळे त्यांना नागपूर येथे रेफर करण्यात आले. दुचाकीस्वार रतीराम तुलावी, विश्वनाथ कोरेटी व दिनेश कोरेटी हे कुरखेडा तालुक्यातील सिन्देसुर येथील रहिवासी असून तिघेही मधधुंद अवस्थेत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली. त्यांना सुद्धा मार लागला असून पुढील उपचारासाठी त्यांना सुद्धा रुग्णवाहिकेने गडचिरोली येथे रेफर करण्यात आले व गडचिरोली येथे रात्री रतीराम तुलावी यांचे निधन झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.