वाघाच्या हल्ल्यात इसम ठार

श्री. अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर

जंगलात काड्या जमा करण्यासाठी गेलेल्या इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना ब्रम्हपुरी तालुक्यातील लाखापुर (मऱ्हारमेंढा) गावानजीकच्या जंगलात आज दि. ५ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली आहे.
यामध्ये मृत झालेल्या इसमाचे नाव जगन हिरामण पानसे वय ७५ वर्ष रा. लाखापुर तह. ब्रम्हपुरी असे आहे.

ब्रम्हपुरी तालुक्यातील लाखापुर येथील रहिवासी असलेले जगन पानसे हे आपल्या शेतावर गेले होते. तिथून परत येत असतांना काडया जमा करण्यासाठी ते जंगलात गेले होते. तेव्हा त्यांच्यावर वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले. त्यामुळे रात्र होऊनही ते घरी न परतल्याने कुटुंबियांनी सर्वत्र शोधाशोध केली. मात्र त्यांचा काहीच पत्ता लागला नाही.
शेवटी दुसऱ्या दिवशी सकाळी शोध घेतला असता जंगलात त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती वनविभागाला कळवताच वनविभागाचे उत्तर वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गायकवाड, क्षेत्र सहाय्यक मिलिंद सेमस्कर, इतर कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. व मृतदेह शवविच्छेदनासाठी ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
मृतकाच्या कुटुंबियांना अंत्यसंस्कारासाठी तातडीने २५ हजार रुपयांची आर्थिक मदत वनविभागाच्या वतीने देण्यात आली आहे.