गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
गडचिरोली – गडचिरोली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मरेगांव येथील ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी मरेगांव येथील नागरीकांनी जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मरेगाव येथील जनतेने दिनांक १९ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतीच्या कामाचा आढावा घेतला असता, मोरी बांधकाम, नाली उपसा, पेसा ५ टक्के अबंध निधीमध्ये ग्रामसभेला विश्वासात न घेता स्वतःच्या मर्जीने कामे करण्यात आली. अनेक बाबीवर अव्वाच्या सव्वा खर्च करण्यात आला. ग्रामसभेने जमा खर्चास नामंजुरी दर्शवून खर्चास मान्यता दिली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे निवेदनातून करण्यात आली. मरेगांव ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत सदस्या नंदा टेकाम, ग्रामपंचायत सदस्य नितीन टेकाम, शंकर आत्राम, तुळशीदास मसराम, गोवर्धन कस्तुरे, विजय दिवठे, संपत वलादे, नामदेव टेकाम, प्रमोद मडावी, संजिवता मेश्राम, अमोल सयाम, यशवंत मेश्राम, सपना शिंदेकर, भागरथा मसराम, विनोद येरमे आदींच्या स्वाक्षऱ्यासह निवेदन देण्यात आले.