गडचिरोली जिल्ह्यातून बोगस टीपी ने रेतीसाठयाची चंद्रपुरात वाहतूक

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

दि.१/१२/२०२२ 

घाटकुळ मार्ग दररोज ३० ते ४० ट्रकांची चंद्रपुरात रेलचेल

गडचिरोली जिल्ह्यात ज्यावेळी रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली नाही.शासनाकडून रेतीघाट चालकांना कुठल्याच प्रकारचा परवाना बहाल करण्यात आला नाही.अशा कालावधीत गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात रेतीची घाटकुळ मार्ग चंद्रपूर जिल्ह्यात वाहतूक सुरू आहे.

दिवसाला ३० ते ४० ट्रक व हायवा भरून या मालाची दिवसाढवळ्या उघडपणे वाहतूक सुरू असताना गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील प्रशासन मात्र सदर प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे.घाटकुळ मार्ग रेती वाहतुकीसाठी बोगस टीपीचा वापर केला जात असून हा प्रकार गोंडपिपरी पोलिसांच्या कार्यवाही दरम्यान नुकताच उघड झाला आहे.दरम्यान अजूनपर्यंत याला आळा बसला नसून दोन्ही जिल्ह्यांच्या प्रशासकीय यंत्रणेच्या आशीर्वादाने हा नियमबाह्य प्रकार राजरोसपणे सुरू असल्याचे बोलल्या जात आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील रेतीघाटांच्या लिलावाची प्रक्रिया पार पडली.मात्र त्यानंतरचा कायदेशीर सोपस्कार अजूनपर्यंत पूर्ण झाला नाही.लिलावधारकांपैकी काहींना आज परवाना देखील बहाल करण्यात आला असणार.त्याचवेळी गडचिरोली जिल्ह्यात सुध्दा जवळपास हीच परिस्थिती आहे.अशावेळी लिलावधारकांना शासनाकडून रेती वाहतुकीचा कुठलाच परवाना निर्गमित झाला नाही त्या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातून चंद्रपूर जिल्ह्यात रेतीची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. पोंभूर्णा तालुक्यातील घाटकुळ मार्ग रेती वाहतुकीची ही वाहने मूल व गोंडपिपरी मार्ग चंद्रपूर जिल्ह्यात दाखल होऊ लागली आहेत.हा प्रकार आजच नाही तर मागील पंधरवड्यापासून बोगस टीपीचा वापर करीत रेतीचा व्यापार करणारे मंडळी आपली दुकानदारी चालवीत आहे.

दिवसाढवळ्या ट्रक व हायवा भरून त्यांचा माल चंद्रपूर जिल्ह्यात पोहोचत असताना पोंभूर्णा,गोंडपिपरी व मूल पोलिसासह येथील महसूल विभाग देखील याकडे कानाडोळा करीत आहे.वाहन चालकांकडे नाममात्र टीपी दिसून येत असून ती टीपी सुद्धा बोगस आणि नियमबाह्य असल्याचे बोलल्या जात आहे.याच टीपीच्या आधारावर गडचिरोली जिल्ह्यापासून तेथील लिलावधारकांनी साठविलेल्या रेती साठ्याचा माल चंद्रपुरात विकला जात असल्यामुळे प्रशासकीय व्यवस्थेबद्दल शंका निर्माण झाली आहे.दिवसाढवळ्या चक्क टीपीवरील मार्ग बदलवून अशारितीने वाहतूक करण्याची हिम्मत अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय रेती व्यावसायिक कसे करू शकणार,हा सर्वसामान्यांना भेडसावणारा प्रश्न आहे.या प्रकरणात दोन्ही जिल्ह्यातील राजकारणी,बडे अधिका-यासह मोठ्या व्यापाऱ्यांचा हात आहे.त्यामुळे अजूनपर्यंत कुठलीच ठोस आणि महत्त्वपूर्ण कार्यवाही संबंधितांविरुद्ध झाली नाही.

 

गोंडपिपरी पोलिसांच्या कार्यवाहीत उघड झाला प्रकार

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील एका रेतीघाट चालकांच्या टीपीवर रेतीची वाहतूक सुरू असताना वढोली-खराळपेठ मार्गावर गोंडपिपरी पोलिसांनी रेती भरलेला ट्रक पकडला.एमएच ३२ क्यू ५७०० हा त्या ट्रकचा क्रमांक असून त्या ट्रक चालकाने पोलिसांना टीपी दाखविली.सदर टीपी ही चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील निफद्रा गावच्या बर्वे नामक रेतीघाट चालकाची दिसून आली.चामोर्शी तालुक्यातील जैरामपूर हा रेतीघाट त्यांनी घेतला होता.पोलिसांनी सदर ट्रक पकडून गोंडपिपरी ठाण्यात जमा केला असता येथील तहसीलदारांनी त्या रेतीवाहतुकीच्या टीपीची चौकशी केली असता सदर टीपी ही बोगस असल्याचे त्यांच्या तपासणीत आढळून आले.त्यामुळे २९ नोव्हेंबर रोजीच्या या कार्यवाहीनंतर आता अशा स्वरूपाच्या टीपीचे आधारावर चंद्रपूर जिल्ह्यात गडचिरोली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक सुरू असल्याची शंका उपस्थित झाली आहे.