तो अर्धवट रस्ता वाहतुकीस धोकादायक

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर 

जिवती,दि.२२/१२/२०२२

काम अतिशय संथ गतीने सुरू

जिवती हा तालुका अतिशय दुर्गम, नक्षलग्रस्त व डोंगराळ भाग म्हणून ओळखला जातो, या तालुक्याची निर्मिती सन २००२ मध्ये करण्यात आली. तेव्हा पासून संपूर्ण तालुक्यातील रस्त्यांची कामे कधीच झाली नव्हती पण मागील वर्षी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील जिवती ते कुंभेझरी या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन खासदर बाळूभाऊ धानोरकर व आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले, पण आज घडीला या रस्त्याचे काम ठप्प आहे. या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतुन होत असल्याची माहिती आहे. सध्या या रस्त्याची मोठया प्रमाणात दुरवस्था झाली असून काम अगदी संथ गतीने सुरू आहे. या रस्त्यावरील संपूर्ण गिट्टी उघडी पडली आहे, तर दीड वर्ष उलटून गेले तरी, पुढील काम सुरू केले जात नसल्याने वाहनचालकांसह परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. रस्ता करायचा नव्हता तर, चांगला रस्ता उखडून ठेवला कशाला, असा प्रश्न यानिमित्ताने केला जात आहे.

कुंभेझरी कडे जाण्यासाठी जिवती येथील रहिवाशांना हाच एक मुख्य मार्ग आहे. व या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा दि. डिसेंबर २०२१ असताना सुद्धा आजपर्यंत अर्धवटच काम झाले आहेे. उद्घाटन झाल्या नंतर काम जदल गतीने होईल, अशी अपेक्षा होती, परंतु दिड वर्ष होत आले तरी कामाला म्हणावी तशी गती नसल्याने वाहनचालक त्रस्त झाले
आहेत. नवीन रस्ता होणार म्हणून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पण, संपूर्ण रस्ता खोदून काढल्यानंतर या रस्त्याच्या पुढील कामाला जशी म्हणावी तशी सुरुवात झाली नाही. गिट्टी व मुरूम टाकून ठेवलेल्या या मार्गावरून वाहन चालविणे अवघड झाले आहे. हा गिट्टी व मुरूम टाकलेला हा रस्ता खड्डेमय झाला आहे. वाहनधारक खड्डे वाचविण्यासाठी मिळेल त्या मार्गाने वाहन नेतात. परिणामी हा मार्ग अपघातास निमंत्रण देणारा ठरत आहे. व रस्त्याचे काम अत्यंत कासवगतीने सुरू आहे, हा संपूर्ण मार्ग धोकादायक झाला असून, काम तातडीने पूर्ण करा. सुरक्षित वाहतूक व्यवस्थेला मदत करा, अशी मागणी करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.