नाल्यात ट्रॅक्टर कोसळून एक तरुण जागीच ठार

आरमोरी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर  

आरमोरी,दि.०६/०१/२०२३

आरमोरी तालुक्यातील शिवनी खुर्द समोर असलेल्या नाल्यात ट्रॅक्टर कोसळून एक तरुण जागीच ठार झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदर घटना आज अंदाजे दोन वाजता घडली.

प्राप्त माहितीनुसार शिवनी (खुर्द) येथील फागोजी टेंभुर्णे यांची ट्रॅक्टर ही शामराव साहारे यांच्या शेतामध्ये चिखलणी करण्याकरिता गेली होती. सदर ट्रॅक्टर नागरवाही येथील अमित दुगा हा चालवीत होता. अमीत ड्रायव्हर हा आपल्या गावाकडे जाण्याकरिता नागरवाहीकडे निघाला असता तू हे ट्रॅक्टर गावाकडे घेऊन जा असे म्हणून तो शिवनी खुर्द येथील सौरव नरहरी मडावी वय 23 यांच्याकडे ट्रॅक्टर दिली. सदर ट्रॅक्टर चालवीत असताना अनियंत्रित होऊन शिवणीच्या नाल्यात अचानक कोसळल्याने त्या तरुणाचा त्या ट्रॅक्टरच्या खाली दबून जागीच मृत्यू झाला. त्याला वेळेवरती मदत मिळू शकली नाही कारण या नाल्यांमध्ये कंबरभर पाणी आणि चिखल असल्यामुळे तो बाहेर निघू शकला नाही. नाल्यात कोसळलेल्या ट्रॅक्टरचे चारही चाक वर असल्याचे घटनास्थळी दिसत आहे. आरमोरी पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करीत आहेत.