श्री.अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
मूल,दि.१४/०२/२०२३
मुल तालुक्यातील व वनपरिक्षेत्र सावली अंतर्गत येत असलेल्या मौजा मोरवाही येथील महिला देवकाबाई पत्रुजी झरकर ही स्वतःच्या शेतात लाखोरी खोदण्याचे काम करीत असताना महिलेवर दबा धरून बसलेल्या अस्वलीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना मूल तालुक्यातील मोरवाही शेतशिवारात सोमवारी सकाळच्या सुमारास घडली.
देवकाबाई पत्रुजी झरकर वय (55) वर्ष रा. मोरवाही असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नांव आहे.
मूल तालुका हा मोठया प्रमाणावर जंगलाने व्यापलेला आहे, यापरिसरात वन्यप्राण्यांचीही मोठी रेलचेल असते, सध्या शेतकरी शेतात लाखोरीचे उत्पन्न घेत असतात, दरम्यान शेतातील लाखोरी खोदत असताना मोरवाही येथील काही महिला शेतावर गेल्या होत्या, यावेळी दबा धरून बसलेल्या अस्वलीने देवकाबाई पत्रुजी झरकर हिच्यावर हल्ला केला परंतु सोबत असणाऱ्या महिलांनी आरडाओरड केल्याने अस्वल तिथुन पडुन गेली मात्र अस्वलीच्या हल्लात देवकाबाई झरकर हया गंभीर जखमी झाल्या, त्यांच्यावर मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळावर सावली वनपरिक्षेत्रातील वनविभागाचे कर्मचारी दाखल होवुन पंचनामा केला आहे. जखमी महिलेच्या कुटुंबियांना वनविभागाने तात्काळ आर्थीक मदत करावी अशी मागणी मोरवाही ग्रामस्थांनी केली आहे. मागील २०२२ या वर्षात अशाच लाख खोदण्याचे शेतीच्या सिजन मधे मोरवाही येथील शेतातच पाल नामक एका महिलेवर वाघाने हल्ला करुन ठार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे संबंधित गावातील व परिसरातील शेतकऱ्यांनी आपली शेती व शेतमजुरी कशी करावी आणि आपल्या कुटुंबीयाचे पालन पोषण कसे करावे असा प्रश्न पडला असून वन विभागाने आपल्या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा जनआंदोलन पुकारावे लागेल असेही गावकऱ्यांनी बोलून दाखविले आहे. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. पी.जी.विरुटकर यांचेशी संपर्क साधून जखमीला तात्काळ आर्थिक मदत देण्यात आली का ? असे विचारले असता केवळ जखमींना मदत देण्याची तरतूद नसल्याचे सांगितले. Newsjagar