वडसा वन विभागाच्या रोपवाटिकेला आग

By Shri.Vilas Dhore
वडसा प्रतिनिधी – वडसा वन विभागाअंतर्गत येत असलेल्या नियतक्षेत्र शिवराजपुर अंतर्गत करण्यात आलेल्या पर्यायी सामाजिक वनीकरणातुन कक्ष नं. ८७० मधील नर्सरीला आग लागल्याने लाखो रुपये किंमतीची वनसंपदा जळून नष्ट झाली आहे. सदर आग शार्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत ‘असून आग आटोक्यात आणण्यासाठी वन विभागाची चमू युद्धस्तरावर तळ ठोकून होती. मात्र उन्हाचा तडाखा व वाळलेल्या गवतामुळे बहुतांशी वनसंपदा जळून नष्ट झाली आहे. वडसा वनविभागाच्या उपविभागीय कार्यालयासमोर पर्यायी वनीकरण योजनेअंतर्गत कक्ष क्रमांक ८७० मध्ये २०१५ ला तब्बल ३० हेक्टर जागेत मिश्र रोपवन करण्यात आले आहे. वनविभागाच्या याच परिसरातून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मुख्य वीज वाहिणीच्या तारा गेल्या असून वीज वितरण कंपनीचे उपकेंद्र लागूनच आहे.
दरम्यान, उपकेंद्रात जोडण्यात आलेल्या ट्रान्सफार्मरवर जोडणी करण्यात आलेल्या तारांत वीज वाहिण्यांच्या दाबामुळे ठिणग्या उडत असल्याचे वास्तव आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने परिसरातील वाळलेला गवत व गवतावर पडलेल्या ठिणगीमुळे गवताने पेट घेऊन आग पसरल्याचे सांगितले जात आहे. जंगलांची उपलब्धता वाढविण्यासाठी वनविभागाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्ष रोपवन मोहिम हाती घेऊन उपलब्ध वनांचे संरक्षण व संवर्धन करण्यावर जोर देण्यात येत आहे. मात्र अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयाची
वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी येऊन जळून राख होत असल्याने जंगलांचे अस्तित्व टिकवून ठेवणे वनविभागासमोर आवाहन ठरू लागल्याचे बोलल्या जाऊ लागले आहे. वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा कसोशीने प्रयत्न केला. मात्र वाळलेला गवत व उन्हाचा तडाखा यामुळे बहुतांशी भागातील वनसंपदा वाचवण्यात चमुला अपयश आले आहे. दरम्यान याच नर्सरीतील ही दुसरी घटना असल्याने वनविभाग व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे पर्यायी व्यवस्था करून परत या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यास्तव प्रयत्न चालवले असल्याचे सांगितले जात आहे. तथापी वडसा वनविभागाच्या उपविभागीय कार्यालयासमोरच असलेल्या ३० हेक्टर मधील नर्सरीत आग लागल्याचे कळताच वनविभागाच्या चमूने वन परिक्षेत्राअधिकारी विजय धांडे यांच्या मार्गदर्शनात घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू होता.