श्री.अरुण बारसागडे ,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्युज जागर
भेंडाळा, दि. १२/०४/२०२३
चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा- गणपूर -अनखोडा या मार्गाची दुर्दशा झाली आहे. या मार्गावरील ठिकठिकाणी असलेले मोठ-मोठे खड्डे वाहतूकदारांना अपघातास आमंत्रण देत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत असताना संबंधित विभाग मात्र मुंग गिळून बसून या रस्त्याकडे कमालीचे दुर्लक्ष केले असल्याने विभागाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.newsjagar
भेंडाळा गणपूर अनखोडा या मार्गावर दुचाकी, चारचाकी तसेच अधूनमधून अवजड वाहनांची सुध्दा वर्दळ राहते. तरीसुद्धा या रस्त्याच्या देखभालीकडे प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. परिणामी या मार्गाची दैनावस्था झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. तसेच डांबरीकरण उखडले गेले असून बारीक गिट्टी, दगड, चुरी रस्त्यावर पसरली आहे. यामुळे दुचाकी, चारचाकी वाहने पंक्चर होण्याचे प्रकारही वाढले आहेत. सदर रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात अनेक नागरिकांनी संबंधित विभाग तसेच लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले मात्र अद्यापपर्यंत या मार्गाची डागडुजी वा पक्के खडीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे या मार्गावरून जीवघेणा प्रवास सुरूच आहे.