धानोरा मध्ये लाखोंचा घबाड जप्त

गुप्त माहितीद्वारे पोलीसांची कारवाई

गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील असलेल्या धानोरा तालुक्यातील हेटी गावात पोलीसांनी आपल्या खबरीच्या मदतीने एका व्यक्तीच्या घरी छापा टाकून तब्बल 32 लाख नगद रूपये जप्त केले. विशेषतः नक्सल प्रभावित धानोरा तालुक्यात एका सामान्य व्यक्ती कडे एवढी रक्कम आढळून आल्याने पोलिसांनी सुध्दा याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी सुरू केली आहे.

प्राप्त माहिती नुसार धानोरा तालुक्यातील हेटी गावातील रहीवासी साईनाथ कुमरे यांच्या कडे लाखोची अवैद्य रक्कम असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली. प्राप्त माहितीच्या आधारे पोलिस विभागाद्वारे साईनाथ कुमरे यांच्या घरी धाड टाकली असता पोलिसांना एका पोत्यात 500 रूपये पासून ते 10 रूपये पर्यतच्या नोटांचे बंडल सापडून आले. हि रक्कम साधारणतः 32 लाखाच्या आसपास असल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित रक्कमे संदर्भात विचारणा केली असता हि रक्कम सट्टापट्टीच्या व्यवसायातून कमावल्याची कबुली सदर व्यक्तिने दिली.

या संबंधात आमच्या प्रतिनिधीने पोलिस विभागाशी संपर्क साधला असता पोलिसांनी सांगितले कि, हा परिसर नक्सल प्रभावित असल्याने सदर रक्कम जप्त करून आयकर विभागाला याची माहिती दिली असून नंतरच पुढील कारवाई केली जाईल. पोलिस विभागाद्वारा जप्त केलेली रक्कम सील करण्यात आली असुन पुढील कारवाई करीता साईनाथ कुमरेला पोलिस स्टेशन ला नेण्यात आल्याचे सांगण्यात आले.