अरुण बारसागडे जिल्हा प्रतिनिधी न्यूज जागर
माजरी- परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. माजरी परिसरात जोरदार पाऊस होत असल्याने पावसाचे पाणी शेतात घुसल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे निम्न वर्धा आणि बेंबाळा धरणातून विसर्ग सुरू असल्यामुळे वर्धा, कोराडी व शिरना नदीला पूर आला आहे. जुलै-ऑगस्टच्या महापुरानंतर सेप्टेंबर मध्येही परिसरातील नद्यांवरील पुल पाण्याखाली गेले.
सद्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी काही ठिकाणी जोरदार पावसामुळे शेतीत पाणी तुंबले आहेत. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. माजरी, पाटाळा,पळसगाव,राळेगाव,मनगावसह अनेक भागात सोयाबीन, कपास, तुर आणि इतर उत्पादकांवर संकट कोसळले आहेत. परतीच्या पावसाने माजरी परिसरात बहुतांशी भागात धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडत आहे. सोयाबीन, कपास व तुरीच्या पाठोपाठ भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला.
दरम्यान परिसरातील हाती येऊ पाहणाऱ्या सोयाबीन, कपाशी या मुख्य पिकाची चांगलीच दैना केली आहे. इतर पिकांना सुद्धा सततच्या पावसाचा दणका बसल्यानंतर आता सोयाबीन, कापूस ही मोठ्या प्रमाणात हातची गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. रविवारी बहुतांश भागात पावसाने उसंत घेतल्याचे पाहायला मिळाले. परिसरात मंगळवारपासून पावसाचा जोर सद्या कमी झाला आहे.
या पावसाचा फटका वणी-वरोरा आणि भद्रावती-चंद्रपुर मार्गावरील वाहतुकीलाही बसला. या मार्गावर वर्धा, कोराडी व शिरना नदीवरचे पुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान वणी, भद्रावती, चंद्रपुर हे मार्ग पूर्णपणे बंद आहे. सोमवारी सायंकाळपासूनच वणी जाणाऱ्या व तिकडून येणाऱ्या अनेक वाहने अडकून पडली आहे.
या पावसामुळं कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून प्रशासनाने नदीकाठावरील वास्तव्यास असलेल्या नागरिकांना आधीच सतर्कतेचा इशारा दिला आहे.