पर्यावरण संवर्धनाची दिवाळी – श्री ज्ञानेश महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा आगळावेगळा उपक्रम

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर

 

 

नवरगाव –
आपल्या भोवताली दिवाळीच्या निमित्ताने केलेली रोषनाई, फटाक्यांचे आवाज, हवेत फटाक्यातील बारूदचा भयान वास, फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे शपथ घेणारे व्हाट्सअपवरील व्हायरल आणि सर्वत्र फराळांचे बार उडताना श्री ज्ञानेश महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे शंभर स्वयंसेवक मात्र यावर्षीची दिवाळी दीडशे वृक्षांचे संवर्धन करून पर्यावरणपूरक करण्याचा केवळ संकल्प केला नाही तर तो प्रत्यक्ष कृतीतून साकार करीत आहे. पर्यावरणाचे संवर्धन करून दिवाळीचा व्यापक संदेश अशा रचनात्मक कामातून समाजाला कसा देता येईल याचा प्रयत्न करीत आहे. पर्यावरण संवर्धनाचे यानिमित्ताने विविध नियोजन करीत आहे.

परतीचा पाऊस जाण्यासाठी उशीर होताना सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात 150 वृक्षांची लागवड करण्यात आली होती. जेमतेम एका महिन्याच्या झाडांना बांबूंच्या काठ्यांचा आधार देऊन झाडांच्या भोवताली पाण्यासाठी आळे करून या सर्व वृक्षांचे संवर्धन होईल याची काळजी घेण्यात आली. यावर्षी राष्ट्रीय सेवा योजनेच्या 100 स्वयंसेवकांनी हे सगळे झाडे दत्तक घेतलीत. गोंडवाना विद्यापीठाच्या दिवाळीच्या सुट्ट्या 19 ऑक्टोबर 2022 पासून सुरू झाल्या. या महिन्यात महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. शेतकऱ्यांच्या पिकांची नासधूसही होते आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मात्र शिंदेवाही तालुक्यात पावसाने काढता पाय घेतला आहे. धानपिकांचे प्रचंड नुकसान करीत असलेल्या या पावसाच्या एक पाय आमच्या वृक्षसंवर्धनासाठी कामी आला. पण सुट्ट्यातील एक महिन्यात ही संपूर्ण झाडे सूकून जाऊ नये म्हणून 16 स्वयंसेवकाचे 6 गट करून. चार स्वयंसेवकांना असिस्टंट टीम म्हणून नेमण्यात आले. विविध गावातील पाच सात किलोमीटर वरून हे स्वयंसेवक नित्यनेमाने महाविद्यालय प्रांगणात येतात. ऐच्छिकपणे सर्व वृक्षांना पाणी देतात. झाडांच्या आजूबाजूला झालेले गवत काढतात. या संपूर्ण वृक्षांचे संवर्धन करीत हे स्वयंसेवक पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करीत आहे.

अफरोज शेख, राहुल शेंडे, कार्तिक ठाकरे आणि सुजित बोरकर हे असिस्टंट टीम मधील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सोळा लोकांच्या ग्रुपला रोज सहकार्य करीत आहे. दिवाळीच्या सुट्टीत वृक्ष संवर्धनाचा विडा या सर्व स्वयंसेवकांनी उचललेला आहे. दिवाळीचा सुट्टीतील आनंद झाडांना पाणी टाकून मिळविणारे, झाडांचे संवर्धन करीत पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करणाऱ्या सर्व स्वयंसेवकाचे स्वागत करण्यात येत आहे.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना महात्मा गांधींची ओळख केवळ राष्ट्रपिता किंवा स्वातंत्र्य मिळवून देणारे नेता एवढीच असू नये गांधी चरित्रातील श्रममूल्ये त्यांना कळावे तसेच गांधी विचार मुळापासून समजावे म्हणून जवाहरलाल नेहरू यांची प्रस्तावना असलेले अनु बंदोपाध्याय यांचे ‘ बहुरूपी गांधी’ हा ग्रंथ शोभा भागवत यांनी मराठीत अनुवाद केलेला आहे. या पुस्तकातील 27 लेख pdf स्वरूपात रोज एक या प्रमाणे राष्ट्रीय सेवा योजनेच्या ग्रुपवर मी शेअर करीत आहे. हे लेख वाचून आमचे स्वयंसेवक रोज वृक्षांना पाणी देत चर्चा करीत आहे. पर्यावरण संवर्धन आणि बौद्धिक जडणघडण अशा दुहेरी उपक्रमातून आमची दिवाळीची सुट्टी अर्थपूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत… यात रोज सहभागी होणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकाचे खूप कौतुक होत आहे.