प्रस्तावित विहिरगाव-मूर्ती विमानतळामुळे “कन्हारगाव अभयरण्यातील” वाघांचे अस्तित्व धोक्यात?

श्री. अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर

आदीवासी बहुल आणि नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळावी या दृष्टीकोनातून जगभरातील पर्यटनाचे आकर्षण असलेल्या आणि वाघांचा जिल्ह्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात विहिरगाव-मूर्ती येथे प्रस्तावित विमानतळाचे काम जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना राज्याचे वन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.मात्र या विमानतळावरून आकाशात झेप घेणाऱ्या विमानाच्या कर्कश आवाजाने कन्हारगाव अभयरण्यातील वाघ व इतर प्राणी विचलित होणार असून त्यांच्या अस्तिवालाच धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कन्हारगाव अभयारण्य महाराष्ट्र शासनाने २१ मार्च २०२१ ला घोषित केले आहे.या अभयारण्यात मध्य चांदा प्रादेशिक वन विभागाचे १८०२.०६४ हेक्टर व वन विकास महामंडळाचे २४७८.१४६ हेक्टर असे एकूण २६९४०.२११ हेक्टर जंगलाचा सहभाग आहे.या जंगलात वाघ,बिबट,अस्वल,सांबर,चितळ आधी प्राण्यांची संख्या विपुल आहे.या जंगलात वाघ व वन्य प्राण्यांना आवशक असलेले खाद्य तसेच पाणी भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे.सद्या वाघांसाठी जंगलात रुबाबात फिरणे कठीण काम आहे.आजच्या आधुनिक काळात जगतांना त्यांना अनेक अडथळे पार करावे लागतात.घनदाट जंगलात वाढलेला मानवी वावर, लोकसंख्येच्या वाढलेल्या गरजा,जंगलात झालेले डांबरी रस्त्याचे मार्ग,रेल्वे मार्ग,महामार्ग,कालवे यांचे जाळे व आधुनिक दळणवळणाची साधने यामुळे जंगलावर प्रचंड जैविक दबाव पडतो.त्यातून वाघांना सुरक्षित राहता येईल अशी आकाराने मोठी व मनुषविरहित जंगले कमी झाली आहेत.मानवी वावर आता जंगलाच्या कानाकोपऱ्यात पोहचला आहे.त्यातून वाघ व माणूस यांच्या सहजीवनात अनेक समस्यां निर्माण झाल्या आहेत.

विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा नंतर कन्हारगाव अभयारण्य विकसित होणार आहे.वाघासह अन्य प्राण्यांच्या दर्शनासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येणार आहेत.अशात जंगलात प्राण्यांचा अधिवास असणे गरजेचे आहे.परंतु कन्हारगाव अभ्यारण्यापासून हाकेच्या अंतरावर मूर्ती विमानतळ विकसित होणार आहे.या विमानतळावरून आकाशात झेप घेणाऱ्या व परिसरात गिरट्या घालणाऱ्या विमानाची संख्याही चांगली असणार आहे.विमानाच्या कर्कश आवाजाचा विपरीत परिणाम वाघ व इतर वन्य प्राण्यावर होणार आहे.अशात या अभयारण्यात वाघाचा अधिवास व अस्तित्वालाच धोका निर्माण होणार आहे.

इको सेन्सेटिव्ह झोन ची कुऱ्हाड
गोंडपीपरी तालुक्यातील कन्हारगाव अभयारण्य घोषित झाले आहे.मात्र एक वर्ष आठ महिन्याचा कालावधी लोटला तरीही विकसित करण्यात आले नाही.अभयारण्याच्या कार्यक्षेत्रातील परिघात येणाऱ्या ५९ गावांना इको सेन्सेटिव्ह झोन म्हणून घोषित करून पर्यावरणदृष्ट्या संरक्षित करण्याच्या हालचालींना शासन स्तरावरून वेग आला आहे.इको सेन्सेटिव्ह झोन क्षेत्रात असलेल्या परिसरात कोणतेही मोठे प्रकल्प,उद्योग,वीट भट्टी उद्योग,खनिज उत्खनन करता येणार नाही.इको सेन्सेटिव्ह झोन जंगलापासून दहा किमी परीघ क्षेत्र असणार आहे.प्रस्तावित मूर्ती विमानतळ या परिघाच्या कार्यक्षेत्रात येणार काय?जर येत असेल तर विमानतळ व अभयारण्य निर्मितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.अभयारण्य झाल्याने परिसरातील हजारो मजुरांचा रोजगार हिरावला आहे.अभयारण्य विकसित झाल्यास काही तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.