श्री. अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर
संबंधिता विरूध्द कारवाई होणार काय ? नागरीकांना प्रश्न
काम पुर्ण करण्यास दोनदा मुदतवाढ देवुनही काम पुर्ण न झालेल्या बस स्थानकाचे काम दोन महिण्यात पुर्ण करावे, असे निर्देश देवूनही संबंधीत कंत्राटदार काम पुर्ण करू शकत नसल्याने नागरीकांमध्यें आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. संबंधीत कंञाटदाराविरूध्द राज्य मार्ग परिवहन महामंडळ कोणती कारवाई करते. याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अधिनस्त चंद्रपूर विभागातील मूल येथील बस स्थानकाचे उपकामांसह आधुनिक पध्दतीने बांधकाम करण्याची प्रक्रिया आँक्टोबर २०१६ पासून सुरू झाली. ८ कोटी ८३ लाख ३३ हजार २०० रूपये महामंडळाने मूल बस स्थानकाच्या नुतीनकरणासाठी निश्चित करून ई निवीदा प्रसिध्द केली. प्रकाशित निवीदेनुसार मूल बस स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी तीन कंत्राटदारांनी निवीदा सादर केल्या. परंतू कामाकरीता निश्चित केलेल्या दरापेक्षा ८ कोटी १४ लाख ८७ हजार ३७७ या कमी दरात काम करण्याची जबाबदारी स्विकारलेल्या वर्धा येथील पार्थ कन्स्ट्रक्शन कंपनीला २ मार्च २०१८ पर्यंत काम पुर्ण करण्याच्या अटीवर येथील बस स्थानकाच्या कामाची जबाबदारी देण्यांत आली.
परंतु प्रशासनातील तांत्रीक अडचणी आणि कामाच्या पध्दतीमूळे येथील बस स्थानकाच्या आधुनिकीकरणास जानेवारी २०१८ पासून प्रत्यक्षात सुरूवात झाली. ३१ जानेवारी २०१८ रोजी सदर कामाचे वास्तुविशारद यांनी कंत्राटदार पार्थ कन्स्ट्रक्शन कंपनीला कामाचे लाईन ले आऊट दिल्यानंतर फेब्रुवारी महिण्याच्या दुसऱ्या आठवडयापासून कामाला प्रत्यक्ष सुरूवात झाली. मार्च २०१८ पर्यंत काम पुर्ण करण्याची मुदत असतांना फेबु्वारी २०१८ पासून कामाला प्रत्यक्षात सुरूवात झाल्यानंतर महिण्याभारात कोटयावधी रूपये किंम्मतीचे अवाढव्य काम पुर्ण होणे कठीण होते. त्यामूळे पार्थ कन्स्ट्रक्शन कंपनीने बस स्थानकाच्या आधुनिकीकरणा साठी वाढीव जागा जलप्रदाय विभागाकडून वेळेत मिळू न शकल्याने कामाची मुदत वाढवून मिळावी अशी विनंती केली. कंपनीची विनंती आणि वास्तविक परिस्थिती लक्षात घेवून महामंडळाने कंत्राटदार कंपनीस १ सप्टेंबर २०१८ पर्यंत काम पुर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिली. परंतू त्याही मुदतीमध्यें पार्थ कन्स्ट्रक्शन कंपनीला काम पुर्ण करता आलेले नाही. त्याही वेळेस कंपनीने बांधकामाचा नकाशा वेळेवर उपलब्ध न झाल्याने, कोवीड १९ मूळे शासनाने टाळेबंदी घोषीत केली आणि रेतीघाटाचा लिलावा अभावी बांधकामा करीता आवश्यक असलेली रेती उपलब्ध होवू शकली नाही, या कारणांमूळे वाढवुन दिलेल्या विहीत मुदतीत कंपनीला काम पुर्ण करता आले नाही, त्यामूळे कामाची मुदत पुन्हा वाढवून दयावी. अशी दुस-यांदा विनंती केली. त्यामूळे त्याही वेळेस महामंडळाच्या बांधकाम विभागाने नोव्हेंबर २०२१ पर्यंत पुन्हा मुदत वाढवून दिली. परंतू सदर मुदत पुर्ण होवून आज वर्ष होत आहे, तरीही सदर कंपनीने येथील बस स्थानकाचे काम पुर्ण केलेले नाही. एकाच वेळेस कामाला सुरूवात झालेल्या बल्लारपूर बस स्थानकाचे काम पुर्ण होवून जनसेवेत रूजू झाले परंतू मूल बस स्थानकाचे बांधकाम मात्र अजूनही अपुर्णचं आहे.
जागेची अडचण, प्रवाशांची मागणी आणि वाढत्या गर्दीमूळे राज्य मार्ग परिवहन महामंडळ सध्या अपुर्ण असलेल्या स्थानकावरून प्रवाश्यांना सेवा पुरवित आहे. अपुर्णावस्थेतील येथील बस स्थानकावरून सध्यास्थितीत दररोज हजारो नागरीक प्रवास करीत असतांना अनेक गैरसोयींना त्यांना तोंड दयावे लागत आहे. जागा आणि बांधकामाने प्रशस्त असलेल्या येथील निर्माणाधिन बस स्थानकावर दररोज हजारो प्रवाश्यांची वर्दळ असते, त्यादृष्टीने पुरेश्या शौचालयाची आवश्यकता आहे. परंतू हजारो प्रवाश्यांची वर्दळ असलेल्या येथील बस स्थानकावर पुरूष आणि महिलांसाठी स्वतंत्र दोन संडास आणि पाच मुता-या आहेत. प्रवाश्यांसाठी शुध्द व थंड पाण्याची व्यवस्था नाही, स्थानकावर तंबुसारखे आच्छादन असल्याने प्रवाशी बसण्याच्या ठिकाणी पंख्याची गरज नाही परंतु पुरेसी प्रकाश व्यवस्था असणे अनिवार्य आहे. कर्मचा-यांचे विश्रांती कक्ष आणि कार्यालयात पंखे आणि प्रकाश व्यवस्था नाही. स्थानकावर उभारलेल्या तंबुमधून पावसाळयात मोठया प्रमाणांत पाण्याच्या धारा प्रवासी बसण्याचे ठिकाणी पडतात, स्थानकावर लावलेल्या स्पाँरटेक्स चोपडया असून पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेमधून प्लॅटफार्मवर पाणी येत आहे. त्यामूळे याठिकाणी अनेक प्रवासी पाय घसरून पडले असून काही प्रवाशी तर हात पाय मोडून बसले आहेत, स्थानकावर लावलेले गट्टु अनेक ठिकाणी उखळलेले आहेत, याशिवाय गैरसोयीच्या काही बाबी आजही जैसे थे आहेत.
अपुर्ण कामास दोनदा मुदतवाढ देवून वर्ष लोटला तरीही येथील स्थानकाच्या कामात गती न आणता अजूनही कासवगतीनेच काम केल्या जात आहे. सदर कंपनी विरूध्द राज्य मार्ग परिवहन महामंडळ कोणती कारवाई करते. याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.